आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:57 PM2024-03-08T18:57:27+5:302024-03-08T18:57:54+5:30

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

Should I go to BJP now ncp sp mla rohit pawar social media post after ed action | आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

MLA Rohit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यामागे काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा ससेमिरा सुरू असून आज पुन्हा एकदा ईडीकडून रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? असा उपरोधिक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

ईडीच्या कारवाईवरून हल्लाबोल करताना रोहित पवार म्हणाले की, "माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईची बातमी वाचली आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं की, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत," अशा शब्दांत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे.

"न्यायालयात दाद मागणार"

ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. "कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही," असंही रोहित पवार म्हणाले. 

दरम्यान, रोहित पवारांशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्यावर कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.  ईडीने जप्त केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची किंमत ही सुमारे ५० कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच या प्रकरणामध्ये ईडीने सुमारे १६१ एकर जमीनही जप्त केली आहे. 

Web Title: Should I go to BJP now ncp sp mla rohit pawar social media post after ed action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.