जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?
By अतुल कुलकर्णी | Published: October 2, 2022 11:04 AM2022-10-02T11:04:51+5:302022-10-02T11:05:26+5:30
तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे... जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनं कैलास शिखर गाठलं आहे...
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे...
जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात
पण, आज आमच्या अस्वस्थतेनं
कैलास शिखर गाठलं आहे...
एकच सवाल, तात्यासाहेब एकच सवाल...
जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?
हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!
फुकट्या पदावलीचा तुकडा घेऊन...
निष्ठेचं कथित प्रमाणपत्र कवटाळून,
राहावं बांदऱ्याच्याच रस्त्यांवर...
कधीतरी, काहीतरी मिळेल या आशेनं
की जावं बेफाम अनामिक आनंदानं...
ठाण्यातल्या मठाच्या दिशेनं...
हा एकच सवाल छळतो आहे..!
तुम्ही ग्रेट होतात तात्यासाहेब...
म्हणून तुम्ही लिहून गेलात...
“जगावं बेशरम लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर
त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या
यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार
डोहामध्ये”
आम्ही तर असा सवालही विचारू
शकत नाही
कारण प्रश्न विचारणाऱ्यांचं पुढं काय होतं
हे तुम्हाला नाही कळणार तात्यासाहेब...!
आमच्या पुढे प्रश्न वेगळेच आहेत तात्यासाहेब,
कसा टिकवावा मतदारसंघ...?
कशी टिकवावी आमदारकी..?
कसा टिकवावा लोकांच्या मनातला विश्वास...?
कशी व्यक्त करावी मनातली टोकाची अस्वस्थता,
की फेकून द्यावं आता हे खांद्यावरचं
जुनाट, मोडीस निघालेलं धनुष्य
त्यात गुंडाळलेल्या बोथट बाणांसह...
आणि नव्याने मिळणारं धनुष्य घ्यावं हाती
त्यातल्या नव्या कोऱ्या टोकदार बाणांसह...
आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी...
कसा करावा तात्पुरता शेवट तात्यासाहेब,
मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांचा..?
की घ्यावा एकदाचा निर्णय
माझ्या मतदारसंघासाठी...
माझ्या आमदारकीसाठी...
माझ्या टक्केवारीसाठी आणि मिळाली तर
माझ्या लाल दिव्याच्या गाडीसाठी...
माझ्या एका निर्णयानं,
अनेक प्रश्नांना मुक्ती मिळेल तात्यासाहेब...
जगावं की मरावं हा प्रश्न तात्यासाहेब
तुमच्या पोरांनी तुमच्यापुढे उभा केला...
आमच्या पोरा बाळांसाठी
राहावं इथंच की जावं ठाण्याच्या दिशेनं
हा खरा प्रश्न आहे आमच्यापुढं...
मुला बाळांचा प्रश्न तुम्हाला नव्हताच तात्यासाहेब,
आम्हाला मात्र एकच सवाल
छळतो आहे,
आमच्या पोरा बाळांच्या
भविष्यातील राजकारणाचा.
इतकी वर्ष निष्ठेनं काम करून
आम्हाला काय मिळालं...?
असा सवाल जेव्हा
बायका पोरं करतात,
तेव्हा काय उत्तर द्यायचं आम्ही..?
तेही कोणी सांगत नाही तात्यासाहेब...
या अस्वस्थतेनं जीवनाला
असा डंख मारला की,
नंतर येणाऱ्या निद्रेला
आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न पडावा,
त्या निद्रेतही पुन्हा स्वप्न पडू लागली तर...?
तर, नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्यासाठी जीव अधीर होत आहे
म्हणून जुनेपण सोडणं सहन करतो आहे...
तात्यासाहेब, निर्जीवपणानं
आमच्या अस्तित्वावर होणारे अत्याचार...
आणि मदतीचा मिळालेला खोका घेऊन
उभे आहोत ताठ मानेने...
आमच्या दयाघनाच्या दाराशी...!
तात्यासाहेब,
“तो” आमच्यासाठी
जीव ओवाळून टाकायला तयार आहे...
एका बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिला
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला,
ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला
“तो” आमच्यासाठी धावून येतोय...
तेव्हा तात्यासाहेब तुम्हीच सांगा
आम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं...?
टू बी ऑर नॉट टू बी,
असा सवाल त्या शेक्सपियरला पडला होता,
जगावर की मरावं हा सवाल तुम्हाला पडला होता,
आम्हाला मात्र
जावं ‘त्या’ गटात की आहे तिथंच राहावं...
हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!
हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!
- तूमचाच, बाबूराव
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"