पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:12 AM2020-02-05T10:12:26+5:302020-02-05T10:37:32+5:30
'घुसखोर हा घुसखोरच असतो'
मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मोर्चा काढणार आहे. यातच आता बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावंच लागेल, या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याच्या भूमिकेवर ठाम का असू नये, असा सवाल करत घुसखोर हा घुसखोरच असतो. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. त्यामुळे यांनी (मनसे) उगाच श्रेय घेऊ नये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "का ठाम असू नये? घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित नाही करता येणार. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. यांनी उगाच श्रेय घेऊ नये. ती बाळासाहेबांनी आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला?"
याचबरोबर, उद्धव ठाकरे म्हणाले, "उदाहरण देतो. मध्यंतरी ‘लोकसत्ता’ने एक अग्रलेख लिहिला होता निश्चलनीकरणाबाबत. निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे एक कारण सांगितलं गेलं होतं त्या वेळी…ते होतं खोटय़ा नोटांचं. संपूर्ण अर्थव्यवस्थेत किती टक्के खोटय़ा नोटा होत्या? काही टक्क्यांत असतील. पण त्या काही टक्क्यांसाठी तुम्ही संपूर्ण चलनी नोटांचे कागदाचे तुकडे केलेत, तसे काही टक्के घुसखोरांसाठी संपूर्ण देशाला रांगेत उभं करताय. मला असं वाटतं, या सरकारचं एक विचित्र धोरण आहे…सतत तुम्हाला टेन्शनखाली ठेवायचं."
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. याआधी मोर्चाचा मार्ग भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारे पोस्टर लावण्यात आले आहे. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना 'मनसे' इशारा, तुमच्या देशात निघून जा' असे पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आले आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावे आहेत.
आणखी बातम्या
एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा
केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप
आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला
'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर