जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही? सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:24 PM2023-10-03T15:24:20+5:302023-10-03T15:28:02+5:30
आमदार सत्यजीत तांबे यांनी नांदेड आणि घाटी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूनंतर सरकारला खरमरीत सवाल केला आहे.
नांदेडमधील सरकारी रुग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत. यामध्ये १६ नवजात बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दोन बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारी रुग्णालयातील या घटनेवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी आमदार सत्यजीत तांबे यांनी नांदेड आणि घाटी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूनंतर सरकारला खरमरीत सवाल केला आहे.
सरकारी रुग्णालये मृत्यूचा सापळा बनत असून आता जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही, असा सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात रविवार ते सोमवार या २४ तासांमध्ये २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली. त्याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये या रुग्णालयात चार नवजात बालकांसह आणखी सात जणांचा जीव गेला. तसेच, आणखी ६३ जण अत्यवस्थ आहेत. या पाठोपाठच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात सुद्धा रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी ऑगस्ट महिन्यात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही १८ जण ४८ तासांत दगावले होते. हे बळी सरकारी रुग्णालयांमध्येच का जातात, जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.
याचबरोबर, गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेने बदलते सरकार आणि बदलते मंत्री पाहिले, पण जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहताना कोणीही दिसत नाही. कोरोनासारख्या महामारीनंतर आरोग्य विभागासाठी जास्तीत जास्त उपाययोजना करणे किती गरजेचे आहे, याचा धडा मिळाला होता. तरीही अनुभवातून शिकून वेळीच सावध होणे सरकारला अजूनही जमलेले दिसत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणातील रुग्णांच्या मृत्यूंमागे सरकारी रुग्णालयात औषध पुरवठा नसणे, उपचार वेळेवर न होणे, रुग्णवाहिकांची दुरवस्था अशी कारणे समोर येत असतील, तर ही महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे, असेही सत्यजीत तांबे म्हणाले.