शरद पवारांविषयी बदनामी तात्काळ थांबवावी- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 08:45 PM2018-01-04T20:45:32+5:302018-01-04T21:01:11+5:30

मुंबई- गेल्या तीन दशकापासून देशासह राज्याच्या विकासामध्ये योगदान असलेल्या शरद पवार साहेबांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हितचिंतकाने फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरू केली आहे.

Should stop defamation of Sharad Pawar immediately - Sunil Tatkare | शरद पवारांविषयी बदनामी तात्काळ थांबवावी- सुनील तटकरे

शरद पवारांविषयी बदनामी तात्काळ थांबवावी- सुनील तटकरे

Next

मुंबई- गेल्या तीन दशकापासून देशासह राज्याच्या विकासामध्ये योगदान असलेल्या शरद पवार साहेबांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हितचिंतकाने फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरू केली आहे. त्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाचा आम्ही धिक्कार करत असून त्याच्याविरोधात न्यायालयीन कारवाई केली जाणार आहेच, शिवाय मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

शरद पवार साहेबांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. अगदी खलिस्तानच्या चळवळीपासून राष्ट्रीय पातळीवर जेव्हा-जेव्हा समस्या निर्माण झाल्या त्या-त्यावेळी शरद पवार यांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्या समस्या सोडवण्यामध्ये शरद पवार यांचे योगदान मोठे राहिले आहे. गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशात दुसरी कृषिक्रांती घडवण्याचे काम शरद पवार यांनी केले त्यांच्याबद्दल असे विकृत मनोवृत्तीची पोस्ट टाकण्यात आली, त्याबद्दल सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर आलेल्या त्या आक्षेपार्ह पोस्टबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली आहेच. शिवाय पक्षाच्या वतीने या वृत्तीविरोधात कडक पावले उचलली जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भीमा कोरेगावमध्ये जी घटना घडली, त्याबद्दल दु:ख होत आहे. काही जातीयवादी लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण तयार केले. त्यामुळे आता परस्परातील सामंजस्य राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. सरकारने न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. मात्र राज्याचे गृहराज्यमंत्री सोशल मीडियाला दोष देत बसले आहेत. त्याअगोदर खोलात जाऊन चौकशी करायला हवी होती, त्यावेळी केली नाही आणि आता अपयश आल्यावर दुसऱ्यावर खापर फोडले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याची आवश्यकता होती, परंतु तसे करण्यात आले नाही असेही सुनील तटकरे म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. कर्जमाफीचा मुद्दा प्रलंबित आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ ते १२ डिसेंबरला हल्लाबोल पदयात्रा काढली. या हल्लाबोल पदयात्रेनंतर झोपी गेलेल्या सरकारला थोडीफार का होईना जाग आली. नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा हालचालही केलेली दिसत नाही, असेही सुनील तटकरे म्हणाले. रोजगार निर्मिती झाली नाही, राज्यात विकास घडत नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१६ जानेवारीपासून मराठवाड्यात आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये पक्षाचे सर्व नेते सहभागी होणार आहेत. ३१ जानेवारीला औरंगाबादमध्ये हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार असून, या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Web Title: Should stop defamation of Sharad Pawar immediately - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.