१०० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Published: February 12, 2016 03:24 AM2016-02-12T03:24:24+5:302016-02-12T03:24:24+5:30
यंदापासून सुरू झालेल्या ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लवकर लागतील अशी अपेक्षा होती.
नागपूर विद्यापीठ : अभियांत्रिकीच्या मूल्यांकनाचा वेग वाढविण्यासाठी परीक्षा नियंत्रकांचे पाऊल
नागपूर : यंदापासून सुरू झालेल्या ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लवकर लागतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत अभियांत्रिकीचा एकही निकाल लागलेला नाही. मूल्यांकनासंदर्भात प्राध्यापकांकडून दाखविण्यात येणारी हलगर्जी हे यासाठी कारण असून परीक्षा विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. सुमारे १०० प्राध्यापकांना परीक्षा नियंत्रकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल , असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु अनेक परीक्षा आटोपून ४५ दिवस उलटून गेले असूनदेखील विद्यार्थ्यांना निकालांची प्रतीक्षाच आहे. अनेक परीक्षांचे निकाल हे ‘डेटा ट्रान्सफर’मध्ये अडथळे आल्यामुळे खोळंबले होते. बहि:शाल विद्यार्थी, तसेच अगोदर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य तऱ्हेने विद्यापीठापर्यंत पोहोचली नाही. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे नामांकन क्रमांक भरले होते. त्यामुळे निकालाशी संबंधित ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक ‘एरर’ दाखविण्यात येत होता.
परंतु अभियांत्रिकीच्या निकालांमध्ये सर्वात मोठी अडचण ही प्राध्यापकांकडून मूल्यांकनासाठी न मिळणारा प्रतिसाद ही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांअगोदरच परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेतली होती. प्राचार्यांनीदेखील मूल्यांकनात सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही निकाल जाहीर झालेले नाही. प्राध्यापक मूल्यांकनासाठी गैरहजर राहत असल्यामुळे परीक्षा विभागाचीदेखील अडचण झाली आहे. मूल्यांकनाला गती मिळावी यासाठी परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी १०० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.(प्रतिनिधी)