राज्यात ३५ एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; निलंबित कर्मचाऱ्यांपैकी ११ बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:45 AM2021-12-17T06:45:37+5:302021-12-17T06:45:48+5:30
आता एसटी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जे एसटी कर्मचारी कामावर रुजू होत नाहीत, त्यांच्यावर एसटी महामंडळ निलंबन, सेवा समाप्ती आणि बदलीची कारवाई करत होते. मात्र, आता एसटी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाईदेखील सुरू केली आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्यावतीने गुरुवारी ३५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे; तर निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ११ कर्मचाऱ्यांना गुरुवारी बडतर्फ करण्यात आले. तसेच गुरुवारी राज्यातील १६९ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले; तर १२ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली; तर १४० कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत एकूण १० हजार ६५० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून, २०५५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे, तर २७६४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
संपात ७६,७६५ सहभागी
सध्या ७६ हजार ७६५ कर्मचारी संपात सहभागी असून, त्यांच्यापैकी एकूण २९२ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे; तर एकूण २२ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारने आमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत , पर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे संपकरी कामगारांचे म्हणणे आहे.