मोदींचा वर्गमित्र दाखवा, दोन लाख रुपये मिळवा
By admin | Published: June 17, 2016 03:04 AM2016-06-17T03:04:22+5:302016-06-17T03:04:22+5:30
महाविद्यालयातून पदवी घेतल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक तरी महाविद्यालयीन वर्गमित्र दाखवावा, आपण त्यास दोन लाख रुपये तत्काळ देऊ, असे खुले आव्हान
आर्णी (यवतमाळ) : महाविद्यालयातून पदवी घेतल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक तरी महाविद्यालयीन वर्गमित्र दाखवावा, आपण त्यास दोन लाख रुपये तत्काळ देऊ, असे खुले आव्हान अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी दिले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित केले होते. आता मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच दाभडी गावाच्या वाटेवर आर्णी येथे काँग्रेसने गुरुवारी ‘चाय की चर्चा’ हे प्रतीकात्मक आंदोलन केले, तेव्हा दिग्विजय सिंह बोलत होते. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे, तेच मोदी करीत असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली. या देशाला खोटे बोलणारा पंतप्रधान नको आहे, त्याऐवजी कमी शिकलेला पंतप्रधान असला, तरी चालेल.
‘मोदी स्वत:ला चहाविक्रेता संबोधतात, परंतु मुळात त्यांनी चहा कधी विकलाच नाही. त्यांच्याकडून चहा विकत घेऊन प्यायलेला असा एक तरी इसम दाखवावा, आपण त्यालाही दोन लाख रुपये देऊ, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरींदरसिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, खासदार राज बब्बर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम प्रामुख्याने उपस्थित होते. बैलगाडीतून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी काळा चहा पिऊन मोदी सरकारचा निषेध नोंदविला. (प्रतिनिधी)
- काँग्रेसच्या ‘चाय की चर्चा’ कार्यक्रमामध्ये भाजपानेही काँग्रेसच्या विरोधात पत्रकबाजी केली. त्यात आदर्श घोटाळा, घरकुल घोटाळा, निम्न पैनगंगा धरणासाठी ३०० कोटी खर्च करूनही सिंचन का झाले नाही, या मुद्द्यांचा समावेश होता. मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचे फलक आर्णीत भाजपाकडून लावण्यात आले.