"संजय राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकूण तरी मारलाय का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:50 PM2022-07-05T14:50:59+5:302022-07-05T14:53:30+5:30
शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.
औरंगाबाद-
शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. "संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घेतात. त्यांचा एखाद्या तरी मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा. या लोकांनी कधी ढेकूण तरी मारला आहे का? आमच्यासोबतच्या चार महिला आमदारांना हे लोक वेश्या म्हणतात. असं बोलणाऱ्यांना लोक जोड्यानं मारतील", अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांच्यावर जोरदार शरसंधान केलं. तसंच आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. सत्ता असूनही मतदार संघातील कामं रखडल्याचंही ते म्हणाले. "मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे आम्हाला भेट देत नव्हते. अनेक निवेदनं देऊनही काहीच कार्यवाही होत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या निवेदनावर काही आदेश दिलेले नसल्याचं अधिकारी आम्हाला सांगायचे. त्यामुळे आमच्या मतदार संघातील कामं खोळंबत होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची कामं मात्र वेगानं होत होती. मग आमदारांमध्ये नाराजी पसरणार नाही, तर आणखी काय होईल?", असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल
"आज प्रवक्ते बाजू मांडतात ते नवीन आलेले आहेत. कधीही झेंडा हातात न घेतलेले लोक आम्हाला शहाणपणा शिकवतात. काल आलेले लोक आम्हाला शिवसैनिकांना शिकवत आहेत. ३७ वर्ष शिवसेनेत खूप चांगलं काम केलं. आम्ही लढून शिवसेना जनसामान्यांमध्ये रुजवली. ३९ आमदार एकत्र आले ते बरं झालं. एकामेकांच्या भावना आम्हाला समजल्या. बंडखोरी केली तेव्हा भविष्याचा विचार केला नाही. कारण सत्तेत राहून कामच होणार नसतील तर थांबण्याचा काय उपयोग", असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच बंडखोरी होऊ नये असं आम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं. पण आमचं म्हणणं ऐकूनच घेतलं गेलं नाही. उलट अरेरावीची भाषा झाली, असंही ते पुढे म्हणाले.