रेशन कार्ड दाखवा उपचार मिळवा
By Admin | Published: June 12, 2014 01:08 AM2014-06-12T01:08:19+5:302014-06-12T01:08:19+5:30
पिवळे आणि केशरी शिधापत्रक (रेशन कार्ड) ३१ नोव्हेंबर २०१३ पूर्वीचे असलेल्यांनाच ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चा लाभ मिळत होता. मात्र शासनाने आज मंगळवारी नोंदणी तारखेचा नियमच
आता जुन्या, नव्या कार्डधारकांना जीवनदायीचा लाभ
नाागपूर : पिवळे आणि केशरी शिधापत्रक (रेशन कार्ड) ३१ नोव्हेंबर २०१३ पूर्वीचे असलेल्यांनाच ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चा लाभ मिळत होता. मात्र शासनाने आज मंगळवारी नोंदणी तारखेचा नियमच वगळण्याची सूचना केली. यामुळे ही योजना आणखी व्यापक झाली आहे. रेशन कार्डाचे नुतनीकरण न केलेल्या किंवा नुकतेच रेशन कार्ड काढलेल्यांनाही आता या योजनेचा फायदा मिळणार आहे.
‘लोकमत’ने ‘शिधा पत्रिकेच्या दुय्यम प्रतीमुळे लाभार्थी अडचणीत’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. यात शिधा पत्रिकेवरील तारखांमुळे लाभार्थी वंचित राहत असल्याचे उजेडात आणले होते, हे विशेष. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत पूर्वी १ एप्रिल २०१३ च्या पूर्वीचे केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या शिधा पत्रिकाधारकांनाच लाभ देण्याचा नियम होता. नंतर यात नोव्हेंबर २०१३ पर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली. त्यानंतरही अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत होते. विशेषत: २०-२५ वर्षे जुनाट झालेल्या, फाटलेल्या, शिधा पत्रिकेवरील नंबर, वितरीत झालेली तारीख किंवा लाभार्थ्यांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याने लाभार्थ्यांना शिधा पत्रिकेची दुय्यम प्रत सादर करावी लागत होती. अन्नधान्य पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी ही प्रत देताना मात्र नवीन तारीख टाकायचे. यामुळे अनेक लाभार्थी वंचित रहायचे. या शिवाय ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळ्या रंगाचे शिधापत्रक आहे, परंतु वेळेवर या कार्डाचे नुतीनकरण केलेले नव्हते तेही वंचित होते. आता या सर्वांनाच या योजनेत समावून घेण्यात आले आहे. तशा सूचना आज सर्व जीवनदायी आरोग्य योजनेच्या जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आता आरोग्य पत्रकासाठी धावाधावही करावी लागणार नाही. (प्रतिनिधी)