शिवसेनेला औकात दाखवू!

By admin | Published: January 29, 2017 05:14 AM2017-01-29T05:14:18+5:302017-01-29T05:14:18+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तिरंगा हाती घेऊन हप्तावसुली व्हायची. आता मुंबईत भगवा हातात घेऊन हप्तावसुली होते, असा आरोप करीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Show Shiv Sena anecdotes! | शिवसेनेला औकात दाखवू!

शिवसेनेला औकात दाखवू!

Next

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तिरंगा हाती घेऊन हप्तावसुली व्हायची. आता मुंबईत भगवा हातात घेऊन हप्तावसुली होते, असा आरोप करीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘छत्रपतींचे नाव घेऊन खंडणी वसूल करणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकारच नाही, असा जोरदार प्रहार शनिवारी शिवसेनेवर केला. २१ फेब्रुवारीला तुमची औकात दाखवू असे आव्हानही त्यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ज्या एनएसई मैदानावर सभा झाली, त्याच ठिकाणी मुंबई भाजपाने आज घेतलेल्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध आमची विचारांची लढाई आहे. शिवसेना व भाजपा या दोघांचाही विचार हिंदुत्वाचा आहे, पण शिवसेनेविरुद्धची आमची लढाई आचारांची आहे. प्रामाणिकतेशी फारकत घेतलेल्यांविरुद्धचे, महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट आचाराविरुद्धचे हे धर्मयुद्ध आहे आणि ते आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
युतीमध्ये आम्ही ११४ जागा मागितल्या होत्या. त्यात काही जागा कमी मिळाल्या, तरी चालतील, पण पारदर्शीपणेच महापालिका चालली पाहिजे, ही माझी मुख्य अट होती. कारभार करताना चुका होतात, आमच्याही झाल्या असतील, पण त्या आम्ही दुरुस्त करतो. त्यांना चुकांवर पांघरूण घालायचे होते. युती नको हे त्यांनी आधीच ठरविले होते आम्ही प्रामाणिकतेशी तडजोड करणार नाही, हे त्यांना माहिती होेते. पारदर्शकतेचा अजेंडा मान्य नसल्यानेच त्यांनी ६० जागांची आॅफर देऊन युती तोडली. तेवढीच आमची औकात होती का? आम्ही २१ तारखेला त्यांना औकात दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
मेट्रो, विमानतळाजवळील झोपड्यांचा पुनर्विकास, सागरी सेतू बाबत शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतली. एकीकडे पाठिंबा दिला आणि दुसरीकडे नागरिकांना चिथावले, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश
मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खा.पूनम महाजन, खा.गोपाळ
शेट्टी, खा. किरीट सोमय्या,
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अ‍ॅड.
आशिष शेलार, पक्षाचे मुंबईतील आमदार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन आ.अतुल भातखळकर यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)

कौरवांची उपमा : आशिष शेलार यांनी शिवसेनेला कौरवांची उपमा दिली. अहंकार चढतो तेव्हा पराभव होतो. पालिका निवडणुकीत भाजपारुपी पांडव हे कौरवांचा पराभव करतील, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्र्यांमुळे ते शक्य झाले. तसेच शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मंजुरी देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र, या दोन्हींचा उल्लेख शिवसेनेच्या वचननाम्यात नाही या बद्दल खेद वाटतो, असे ते म्हणाले.

- आ.आशिष शेलार यांनी आजची सभा ही पांडवांची असल्याचा उल्लेख केला होता. तो संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्यांना (शिवसेना) कौरव म्हणणार नाही, कारण त्यांना घेऊन मी सरकार चालवतो. श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले होते की पांडवांची बाजू न्यायाची आहे, तू त्यांना राज्य देऊन टाक. पण अहकांरी दुर्योधनाने ‘सुईच्या टोकावर मावेल एवढीदेखील जागा देणार नाही, असे म्हटले. धृतराष्ट्राच्या आजूबाजूला दुर्योधन अन् शकुनीमामा बसलेले होते आणि धृतराष्ट्राचे कान भरत होते, तसेच ते आजही उद्धव ठाकरेंभोवती बसलेले आहेत. दादरमधील एका नेत्याला (राज ठाकरे) ही स्मारके नको असल्याने तसे झाले का, असा खोचक सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची आश्वासने
गरीब, मध्यमवर्गीयांना मुंबईतच त्यांच्या हक्काची घरे देणार.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास तिथेच करून रहिवाशांना ४५० चौरस फुटांचे घर देणार.
मुंबई विमानतळाजवळील केंद्र सरकारच्या जागेवरील झोपडपट्टीवासियांना तिथेच हक्काची घरे देणार.
येत्या चार वर्षांत शिवडी-नावाशेवा हा २२ किमीचा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू उभारणार.
कोळीवाड्यांचा पुनर्विकास करणार. सागरी सेतू बांधताना कोळी बांधवांच्या हक्कावर कोणतीही गदा येऊ देणार नाही.
मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे उभारणार. एक तासात मुंबईच्या कोणत्याहीभागात तासाभरात जाता येईल. मुंबईकरांना अद्ययावत नागरी सुविधा देणार.

युतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली, या उद्धव ठाकरेंच्या विधानावर फडणवीस यांनी, प्रत्युत्तर दिले की, ‘आमची २५ वर्षे सडली नक्कीच नाहीत. छोटा भाऊ म्हणून आम्ही राहिलो. आमच्या भरवशावर त्यांना २५ वर्षे महापौरपद मिळाले, पण इतक्या वर्षांनी आम्हाला हा धडा नक्कीच दिला की, कोणाहीसोबत फरफटत जाऊ नका. बरं झालं त्यांनी युती तोडली. मुंबईचे आता नुकसान तरी होणार नाही. परिवर्तन आम्ही करणारच.’

इतर भाषकांचेही योगदान
मुंबईवर मराठी माणसाचा हक्क आहेच आणि तो आम्हाला मान्यच आहे, पण गेल्या तीन-चार पिढ्यांपासून येथे राहणाऱ्या अमराठींनीही या शहराच्या विकासात भूमिका बजावली आहे. जात, भाषा, धर्माच्या नावावर राजकारण आम्हाला मान्य नाही.
‘सब का साथ,सब का विकास’ हे
आमचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांचा आवाज बसला, म्हणून ते पाणी प्यायले. ‘आज पाणी पितोय, पण २१ तारखेला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही,’ असे ते म्हणाले.

Web Title: Show Shiv Sena anecdotes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.