एकतरी स्मार्टसिटी दाखवा; भुजबळ यांचे सरकारला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:16 AM2018-12-01T06:16:28+5:302018-12-01T06:16:47+5:30
अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
मुंबई : पाच वर्षात राज्यात दहा स्मार्ट सिटी करणार होतात त्याचे काय झाले, असा सवाल करत एकतरी स्माटरसिटी दाखवा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारला केले.
अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या काळात २ लाख कोटीचे कर्ज झाले. त्यात आधीच्या युती सरकारने करुन ठेवलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश होता. मात्र आताच्या भाजपा-शिवसेना सरकारने ते कर्ज ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांवर नेऊन ठेवले आहे. राज्याचा महसूल कमी झाला म्हणून खर्चासाठी कर्जाची रक्कम वापरली जात आहे. बुलेट ट्रेनसाठी जपानकडून १ लाख कोटींचे कर्ज घेतले. समृध्दी महामार्गासाठी दक्षिण कोरियाकडून कर्ज घेतले. कर्ज काढून सण साजरा करण्याचे काम राज्यसरकार करत असल्याचा टोला आमदार भुजबळ यांनी लगावला.
राज्यात पाणीटंचाई असताना दमन गंगा, नार-पार या धरणाचे पाणी गुजरातकडे वळविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठया वल्गना केल्या. कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय, असा सवालही भुजबळ यांनी केला.