हे म्हणे ‘करून दाखवले’
By admin | Published: January 6, 2017 06:19 AM2017-01-06T06:19:05+5:302017-01-06T06:19:05+5:30
अपूर्णावस्थेत असलेल्या अथवा यापूर्वीच सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन अथवा लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी करण्याचा घाट स्थानिक शिवसेना नेत्यांनी घातला आहे
ठाणे : अपूर्णावस्थेत असलेल्या अथवा यापूर्वीच सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन अथवा लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी करण्याचा घाट स्थानिक शिवसेना नेत्यांनी घातला आहे. मागील महापालिका निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीने अपूर्णावस्थेतील कामांच्या उद्घाटनाचा धडाका शिवसेनेने लावला होता.
गेल्या निवडणुकीपूर्वी उद्घाटन केलेले ‘वारकरी भवन’ ओसाड अवस्थेत आहे. खेवरा सर्कल येथे उद्घाटन केलेल्या भाजी मंडईचे रूपांतर आता एसआरए योजनेच्या कार्यालयात झाले आहे. यावेळीच्या शिवसेनेच्या उद्घाटन कार्यक्रमावर कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेचे वादळ घोंघावत होते. परंतु, त्याचा अडसर दूर झाल्याचा दावा शिवसेनेने केला.
निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी उद्घाटने व भूमिपूजन समारंभ उरकण्याची घाई सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना ठाणे शहराचे स्वरूप बदलायचे आहे. विविध विकासकामांचे श्रेय घेणारे प्रशासनाचे आणि सत्ताधारी पक्षाचे वेगवेगळे बॅनर शहरात लागण्याची ठामपाच्या इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ आहे. मात्र, प्रशासनाच्या माध्यमातून हे श्रेय राज्यातील सत्ताधारी भाजपाने हिरावून घेऊ नये, यासाठी सेनेची धडपड सुरू आहे. ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनामध्ये अर्धवट अवस्थेत असलेल्या मॉडेल रोडचा समावेश आहे. या रस्त्याचा लोकार्पण सोहळा उरकण्यात येणार आहे. ज्युपिटर रुग्णालयासमोरील पादचारी पूल ठाणेकरांसाठी यापूर्वीच खुला झाला असताना त्याचाही लोकार्पण सोहळा होणार आहे. कळवा उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर आता त्याच्या भूमिपूजनाचा घाट घातला आहे. या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा पालिकेचा विचार होता. परंतु, त्यांची वेळ मिळाली नसल्याने या पुलाचे काम अगोदरच सुरू केले आहे.
पालिकेने शिवसेनेने आयोजित केलेले हे कार्यक्रम होऊ शकतात, असा दावा केला होता. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याला आक्षेप घेण्यात आला. अखेर, निवडणूक आयोगाकडे याबाबत विचारणा झाली व त्यांच्या मंजुरीनंतर कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते, खारेगाव येथील हरी पाटील उद्यान, श्रीपत कृष्णा पाटील उद्यान, महिला कर्करोग निदान व उपचार केंद्र, अॅम्फी थिएटर, एफओबी, मॉडेल रस्ते, नियंत्रण कक्ष वाहन यांचा लोकार्पण सोहळा आणि फायर स्टेशन (आनंदनगर), कळवा ब्रिज, जुने ठाणे नवे ठाणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)