श्रद्धा, सबुरी... साईबाबांच्या छत्रछायेत भाजपची टॅगलाइन, आज अधिवेशन
By यदू जोशी | Updated: January 12, 2025 05:31 IST2025-01-12T05:31:09+5:302025-01-12T05:31:46+5:30
‘श्रद्धा’वान कार्यकर्त्यांना नेते निवडून आणणार

श्रद्धा, सबुरी... साईबाबांच्या छत्रछायेत भाजपची टॅगलाइन, आज अधिवेशन
- यदु जोशी
शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीनगरीत भाजपचे महाअधिवेशन आज, रविवारी होत असताना पक्षाने अनेक विषयांबाबत साईबाबांच्या शिकवणुकीनुसार ‘श्रद्धा व सबुरी’ची टॅगलाइन घेतल्याचे स्पष्ट झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना ही टॅगलाइन अधोरेखित केली. त्यातून, ‘महायुतीत तूर्तास नवीन पक्ष येणार नाही, विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांना लगेच पक्षात घेतले जाणार नाही हे स्पष्ट झाले.
शरद पवार यांनी रा. स्व. संघाची प्रशंसा करणे, त्यांच्या पक्षातील खासदार अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा, उद्धवसेनेच्या मुखपत्रात झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि स्वबळावर लढण्याचे खा. संजय राऊत यांनी दिलेले संकेत या पार्श्वभूमीवर भाजप नवीन मित्रपक्ष जोडणार, मविआ फुटणार अशी चर्चा आहे. बावनकुळे म्हणाले की, तसे काही नाही. काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्वाचा आधार गेला, नुकसान झाले याची उपरती ठाकरे यांना झालेली दिसते.
‘ते’ नेते, नव्या मित्रपक्षांना सबुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाआधी, ‘आपल्याला महायुतीसाठी त्याग करावा लागू शकतो, शेवटी श्रद्धा व सबुरी महत्त्वाची असते’, असे विधान केले होते. मंत्रिपद न मिळालेल्या व अन्याय झाल्याचा सूर लावणाऱ्या बड्या नेत्यांनाही सबुरीचा सल्ला दिला जात आहे.
अमित शाह आज मार्गदर्शन करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या ज्या नेत्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली किंवा महाविकास आघाडीकडे गेले, अशांना महायुतीतील त्या-त्या पक्षात परत घेताना तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून एकमताने निर्णय घेतील. विधानसभा निवडणुकीत श्रद्धेने काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देणार.