श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 09:14 AM2022-11-20T09:14:59+5:302022-11-20T09:15:35+5:30
श्रद्धा आणि आफताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल.
उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील -
सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना थंड डोक्याने केलेला खून असे वर्णन केले आहे, पण आफताबने ज्या पद्धतीने श्रद्धा वालकरचा खून केला, तिच्या शरीराचे तुकडे करून प्रेताची विल्हेवाट लावली आणि त्याच घरात राहिला, ते पाहून मी म्हणेन त्याने गोठलेल्या रक्ताने श्रद्धाचा खून केला. श्रद्धाचा खून आफताबनेच केला, हे सिद्ध करण्यासाठी दिल्ली पोलिसांपुढे काही आव्हाने आहेत...
- श्रद्धाचा खून करण्यामागे आफताबचा
हेतू काय होता?
- श्रद्धा आणि आफताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल.
- आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर काही रसायनांची फवारणी केली. ती रसायने कोणाकडून विकत घेतली आणि त्या विक्रेत्याकडून आफताबची ओळख पटवून घ्यावी लागेल.
- आफताबने फ्रीज कोणाकडून विकत घेतला? त्या विक्रेत्याकडून आफताबची ओळख पटवून घेणे.
- आफताबने श्रद्धाच्या मांसाचे व हाडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रासायनिक तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांना ते सिद्ध करावे लागेल.
- आफताबने विल्हेवाट लावलेले मांसाचे तुकडे मनुष्याचेच आहेत, हे सिद्ध करावे लागेल.
- श्रद्धाच्या पालकांचे रक्त तपासून त्यांचे डीएनए व तुकडे केलेल्या मांसाचे डीएनए तपासून आफताबने विल्हेवाट लावलेल्या शरीराचे तुकडे श्रद्धाचेच आहेत, हे सिद्ध करावे लागेल.
सारांश असा की, हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल. पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी निर्माण करावी लागेल. कधी-कधी साक्षीदार खोटे बोलतात. परिस्थितीजन्य पुराव्यांना कायदेशीर महत्त्व आहे.
फौजदारी खटल्यात सरकारी पक्षाला आरोपीच्या विरोधात निःसंशयपणे गुन्ह सिद्ध करावा लागतो. आरोपीला केवळ अटक करून पोलिसांचे काम होत नाही. त्याला गुन्ह्यात दोषी असल्याचे सिद्ध करावे लागते. दिल्ली पोलिसांना आफताबला या खटल्यात आरोप सिद्ध करावे लागतील.
- शब्दांकन : दीप्ती देशमुख