श्रद्धाच्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर दिसतोय तिचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 03:32 PM2022-11-20T15:32:06+5:302022-11-20T15:32:15+5:30
श्रद्धाच्या क्रूर हत्येची माहिती उघड झाली आणि श्रद्धा, आफताब राहत असलेल्या परिसरात भीषण शांतता पसरली. उरली आहे, ती फक्त कुजबुज. त्यांच्या नात्याची. श्रद्धा सारे झुगारून या नात्यातून बाहेर का पडली नाही? घर सोडतानाचा तिचा स्वतंत्र बाणा असा कसा लोप पावला, हाच प्रश्न तिच्या मित्रमैत्रिणींना पडलाय. त्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तिचा मृत्यू...
मंगेश कराळे -
वसईतील श्रद्धाची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या करत शरीराचे ३५ तुकडे केल्याची बातमी १४ नोव्हेंबरच्या सकाळी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि या हत्याकांडनंतर वसईत पसरली भयाण शांतता. त्याची माहिती घेणाऱ्यांना दिसत होते, मित्रमैत्रिणीसह अनेकांचे भेदरलेले चेहरे. तिच्या या हत्येमुळे सर्वत्र संताप आहे. आक्रोश आहे. तेवढीच त्याच्याबदद्ल चीडही आहे.
आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता स्वतःच्या मर्जीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धाचे तुकडेतुकडे केल्याच्या घटनेने सारे हादरून गेले. या हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली, ती वसईतील तत्कालीन पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी. पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सुओ मोटो दाखल करत वसईतूनच या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि ती दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळेच श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाला सहा महिन्यांची वाचा फुटली.
श्रद्धाचे वडील आणि भाऊ राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना ही बातमी कळताच सारे सुन्न झाले. तिच्या घर सोडण्याने हाय खाल्लेल्या तिच्या आईचा आधीच मृत्यू झाला आहे. ती जर असली, तर हा धक्का तिने कसा सोडला असता, असाच प्रश्न सर्वांना पडलाय. इमारतीत कोणाला काही समजेनासे झाले आहे. अनेकांना अजून हा धक्का पचवता आलेला नाही. आपल्या मैत्रिणीची तिच्या प्रियकराने केलेली क्रूर हत्या समजल्यावर मित्र आणि मैत्रिणींच्या पायाखालची वाळू सरकली. सध्या श्रद्धाबाबत कोणीही बोलायला तयार नाही. सर्वांच्या डोळ्यात दिसते, ती दाटलेली भीती आणि तीव्र संताप.
... तेव्हाच तिने गुन्हा दाखल करायला हवा होता -
श्रद्धाला डिसेंबर २०२० मध्ये आफताबने मारहाण करून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला मी तुळींज पोलीस ठाण्यात घेऊन गेलो होतो. पोलिसांनी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने तिला तसा अर्ज देण्यास सांगून मारहाण आणि गळा दाबल्याबद्दल वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले होते.
तिने कानाडोळा केला. तपासणीसाठी गेलीच नाही. तेव्हाच तपासणी झाली असती आणि गुन्हा दाखल केला असता, तर आज ती जिवंत असती, असे तिचा मित्र राहुल राय याने सांगितले.
आफताबने अनेक वेळा तिला मारहाण केली होती. ती स्वतःच ते सांगायची. हेही तिच्या मित्रमैत्रिणींनी सांगितले. पण असे असूनही ती या नात्यातून बाहेर का पडली नाही. तिने आफताबवर गुन्हा दाखल का केला नाही, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे.
गुन्हेगारी आणि सिनेमा...
चित्रपटांना समाजमनाचा आरसा मानले जाते. त्यामुळेच या आरशामध्ये जसे समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब उमटत असते, तसेच चित्रपटांमधील गुन्हेगारी शैलीचे अनुकरणही होत असते. रुपेरी पडद्याने नेहमीच सत्य घटनांची दखल घेत त्यातील दाहकता अधिक प्रभावीपणे चित्रपटरूपात सादर करण्याचे काम केले आहे. यात अमानुषपणे केल्या जाणाऱ्या अत्याचार आणि हत्याकांडांपासून दरोड्यांसारख्या घटनांचाही समावेश असतो. यात प्रामुख्याने ‘नो वन किल जेसीका’, ‘तलवार’, ‘छपा’, ‘नॉट अ लव्ह स्टोरी’, ‘शूट आउट ॲट लोखंडवाला’, ‘स्पेशल छब्बीस’, ‘सरबजीत’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ आदी हिंदी-मराठी चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांमधील घटनांवरून प्रेरित होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती बाळगल्याचीही बरीच उदाहरणे आहेत.