शेवटपर्यंत मुलीसाठी लढले, पण..; श्रद्धा वालकरच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:45 IST2025-02-09T13:45:05+5:302025-02-09T13:45:05+5:30
Shradha Walkar Murder Case: बहुचर्चित श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरुन सोडले होते.

शेवटपर्यंत मुलीसाठी लढले, पण..; श्रद्धा वालकरच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sharadha Walkar News: दिल्लीसह संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून श्रद्धाचे वडील अंत्यसंस्कारासाठी आपल्या मुलीचा मृतदेह देण्याची मागणी करत होते. पण, शेवटपर्यंत त्यांची इच्छा अपुरीच राहिली. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे आज मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या हत्येनंतर ते नैराश्येत गेले होते.
श्रद्धा प्रकरण साकेत न्यायालयात प्रलंबित
श्रद्धा वालकरचे उर्वरित शरीर गेल्या अडीच वर्षांपासून दिल्लीच्या मेहरौली पोलीस ठाण्यातील गोदामात एका छोट्या पेटीत बंद आहे. साकेत न्यायालय हे मेहरौली पोलीस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. या न्यायालयात 1 जून 2023 पासून म्हणजेच, गेल्या दोन वर्षांपासून श्रद्धा प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. या सुनावणीदरम्यान अनेकवेळा श्रद्धाच्या शरीराचे तुकडे न्यायालयात हजर केले जायचे.
श्रद्धाची काही हाडे शिल्लक
श्रद्धाचे वडील विकास वालकर जवळपास अडीच वर्षांपासून मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाचे उरलेले तुकडेही मिळण्याची वाट पाहत होते. गेल्या अडीच वर्षांपासून विकास वालकर जेव्हा जेव्हा साकेत कोर्टात हजर राहायचे, तेव्हा त्यांना कोर्ट रुममध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवलेला बॉक्स दिसायचा. त्यांनी वारंवार हे उर्वरित तुकडे देण्याची मागणी केली, पण या प्रकरणातील महत्वाचा पुरावा असल्याने कोर्टाने शेवटपर्यंत मृतदेहाचे तुकडे दिले नाही.
श्रद्धाच्या हत्येने संपूर्ण देश हादरला...
ही घटना 18 मे 2022 रोजी दिल्लीतील मेहरौली भागात घडली. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाटी शरीराचे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर एक एक करत तो या तुकड्यांची विल्हेवाट लावायचा. सहा महिने आपल्या मुलीचा संपर्क न झाल्याने वडील विकास वालकर यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. 12 नोव्हेंबर 2022 रोजी आफताबला मेहरौली येथे शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावताना पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले.