श्रावण ते दिवाळी कालावधीत कांदा रडविणार, बाजारभाव दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 04:00 AM2017-08-04T04:00:25+5:302017-08-04T04:00:29+5:30
राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २० ते ३० रुपये झाले आहेत. दिवाळीपर्यंत आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याने कांदा सण, उत्सव काळात ग्राहकांना रडविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईमध्ये बहुतांश कांदा हा नाशिक, पुणे परिसरांमधून येतो. राज्यातील इतर शहरांमधूनही कांदा विक्रीसाठी येत असतो. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ९ ते १० रुपये किलो होते. गुरुवारी अचानक हे दर २० ते ३० रुपयांवर गेले. आठ दिवसांपूर्वी १५९६ टन कांदा विक्रीसाठी आला होता. आता आवक १०३६ एवढी कमी झाली आहे. सरासरी ५०० टन आवक घसरली आहे. श्रावण महिना सुरू आहे, गणपती, दसरा व दिवाळीच्या दरम्यानही आवक कमीच राहण्याची शक्यता असून, भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शेतकºयांकडून कमी दराने कांदा खरेदी करून तो साठवून ठेवून कृत्रिम टंचाई केली जात असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
तात्पुरती घसरण : लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद -
नाशिक/धुळे - पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरूवारी कांद्याला हंगामातील सर्वाधिक २,६९१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. परंतु आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही तासातच भाव पाचशे रुपयांनी घटल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात आला.
कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने साठवून ठेवलेला कांदा शेतकºयांनी विक्रीला काढला आहे. त्यामुळे आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ही तात्पुरती घट पहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीमध्येही असाच प्रकार पहायला मिळाला. कांद्याला २६५० रुपयांचा भाव मिळाला. दुपारपर्यंत ६०३ वाहनातील कांद्याचे लिलाव झाले. त्यानंतर व्यापाºयांनी कमाल भाव १७५० रूपये पुकारण्यास सुरूवात केली. दरात ९५० रूपयांची घट झाल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकºयांनी लिलाव बंद पाडले.
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर उपबाजार समितीत २,६५५ रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. सरासरी भाव २००० ते २५०० रुपये असा राहिला. आवक वाढू लागल्यामुळे उपबाजार समितीने सटाणा रस्त्यालगत ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे यांच्या तीन एकर खुल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात कांदा मार्केट हलविले आहे. धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातूनही आवक झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली.
पुणे जिल्हातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १० किलोस ३०० रुपये भाव मिळाला. मागील वर्षीपेक्षा चौपट भाव मिळाला आहे. १५ हजार पिशवी आवक होऊनही बाजारभाव कडाडले आहेत.
गुजरातमधील अतिवृष्टी आणि मध्य प्रदेशातील दीड लाख टन कांदा खराब हवामानामुळे सडल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. महाराष्ट्रातील खरीप कांदा बाजारात येईपर्यंत किमान तीन महिने तरी भावात स्थिरता राहील.
किरकोळ बाजारात ३० रुपये किलो-
मुंबई बाजार समितीमध्ये २७ जुलैला ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २० ते ३० रुपये झाले आहेत.