कोल्हापुरात श्रीपूजकास मारहाण
By admin | Published: June 23, 2017 02:42 AM2017-06-23T02:42:56+5:302017-06-23T02:42:56+5:30
अंबाबाई मंदिरातील ‘श्रीपूजक हटाओ’ मागणीच्या बैठकीत श्रीपूजक व भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अश्लील हावभाव आणि कुत्सित हास्य
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील ‘श्रीपूजक हटाओ’ मागणीच्या बैठकीत श्रीपूजक व भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अश्लील हावभाव आणि कुत्सित हास्य केल्याने गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच महिलांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी ठाणेकर यांना पोलीस गाडीतून सुरक्षितस्थळी हलविले.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ९ जूनला श्रीपूजक अजित ठाणेकर, बाबूराव ठाणेकर व योगेश जोशी यांनी घागरा-चोलीतील पूजा बांधली. त्याबद्दल भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यातूनच श्रीपूजकांविरोधात मंदिरातील ‘श्रीपूजक हटाओ’ संघर्ष समितीने तीव्र आंदोलन उभारले. पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरही शासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. या पार्श्वभूमीवर दुपारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे घेण्यात आली. त्यास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
अजित ठाणेकर यांनी देवीला घागरा नेसवण्याऐवजी तो पायावर ठेवायला हवा होता. घागरा-चोली नेसवल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या गुन्ह्याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त व शिक्षा म्हणून दोन दिवस अन्न-पाणी न घेता मंदिरात उपोषण करावे, असा प्रस्ताव पालकमंत्री पाटील यांनी मांडला. तो अमान्य करीत आंदोलकांनी ठाणेकर यांना कायमस्वरूपी मंदिर बंदी करावी, असे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी ‘मला असे करता येणार नाही,’ असे सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलकांमध्येच ठाणेकर यांना काय शिक्षा द्यावी यावर गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी मागे बसलेले श्रीपूजक अजित ठाणेकर सर्वांकडे पाहत कुत्सित हास्य करत अश्लील हावभाव केले. हे पाहून आंदोलक संतप्त झाले. घोषणा देत ते ठाणेकर यांना मारायला धावले.
श्रीपूजक हटाव प्रक्रिया सुरु
‘पंढरपूरच्या धर्ती’वर अंबाबाई मंदिरातही शासननियुक्त पुजारी नेमावेत या मागणीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यांनी २२ सप्टेंबरपूर्वी राज्याच्या न्याय व विधी विभागाला अहवाल द्यावा, त्यानंतर शासन निर्णय घेईल, असे आदेश पाटील यांनी बैठकीत दिले.