श्रीविठ्ठलाचे २५ जूनपासून २४ तास दर्शन मिळणार
By Admin | Published: June 18, 2017 12:27 AM2017-06-18T00:27:31+5:302017-06-18T00:27:31+5:30
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात त्यांच्यासाठी २५ जूनपासून २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (जि. सोलापूर) : सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात त्यांच्यासाठी २५ जूनपासून २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री अशा एकूण
चार वाऱ्या भरतात़ सर्वाधिक
मोठी आषाढी वारी ४ जुलै रोजी असून यासाठी देहूहून जगद्गुरू संत
तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने तर आळंदीहून संतश्रेष्ठ
ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे़
यासह अन्य संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत़ काही वारकरी आषाढी वारी दिवशी पांडुरंगाचे
दर्शन घेण्यास विलंब होतो
म्हणून त्यापूर्वीच पंढरपुरात येऊन दर्शन घेतात व पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होतात़ त्यामुळेच मंदिर समितीने तब्बल ८ दिवस अगोदर म्हणजेच २५ जूनपासून २४ तास दर्शन सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़
शिवाय २८ जूनपासून ते ९ जुलैपर्यंत व्हीआयपी तर १ ते १० जुलैपर्यंत आॅनलाइन दर्शनसेवाही बंद ठेवण्यात आली आहे़ त्यामुळे या कालावधीत केवळ रांगेतून येणाऱ्या भाविकांना श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेता येणार असल्याने व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले़
नित्योपचार पूजेत बदल
श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे नित्योपचार - पहाटे ४ वाजता श्रींचा दरवाजा उघडणे,
४ ते ५ काकड आरती व नित्यपूजा, सकाळी ११ ते ११़१५ वा़ महानैवेद्य, दुपारी ४़३० ते ४़५० पोषाख,
सायं़ ६़४५ ते ७ धुपारती, रात्री ११ ते १२ पाद्यपूजा, रात्री १२ ते १ शेजारती करून रात्री १ वाजता मंदिर बंद केले जाते़
मात्र आषाढी यात्रा कालावधीत नित्योपचारामध्ये बदल केले असून पहाटे ४ ते ५ या कालावधीत काकड आरती व नित्यपूजा, १०़४५ ते ११ महानैवेद्य आणि रात्री ८़४० ते ९़१०पर्यंत लिंबूपाण्याचा नैवेद्य इतकेच नित्योपचार केले जातील, असे नित्योपचार प्रमुख हणमंत ताटे यांनी सांगितले़