श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती
By admin | Published: April 1, 2015 11:17 AM2015-04-01T11:17:09+5:302015-04-01T15:18:49+5:30
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीकर परदेशी यांच्यासाठी आता अच्छे दिन आले असून परदेशी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी बढती देण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीकर परदेशी यांच्यासाठी आता अच्छे दिन आले असून परदेशी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी बढती देण्यात आली आहे. परदेशी सध्या राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचे महानिरीक्षकपदी कार्यरत होते.
पुण्याच्या आयुक्तपदी कार्यरत असताना श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरु केला होता. राजकीय दबावाला झुगारुन परदेशी यांनी कारवाई सुरु केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. मात्र तत्कालीन सत्ताधा-यांनी परदेशी यांची आयुक्तपदावरुन बदली करत थेट मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागात पाठवले होते. परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात पुणेकरांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र परदेशी यांच्या कार्याची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे.
केंद्र सरकारने चार आयएएस अधिका-यांची पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदी नियुक्ती केली आहे. यात परदेशी यांच्यासह गुलजार नटराजन, ब्रिजेश पांडे, मयुर महेश्वरी यांचाही समावेश आहे. परदेशी हे २००१ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. नांदेड मुख्याधिकारी, पुणे आयुक्त, मुद्रांक व नोंदणी विभागाचे महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम केल्यावर परदेशी यांनी थेट दिल्ली गाठली आहे. दिल्लीत त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल.