श्रीपाद छिंदम तृतीय पंथीयाच्या रूपात, शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये देखावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 01:48 PM2018-03-04T13:48:20+5:302018-03-04T15:39:02+5:30
छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लिपस्टिक, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आहे, असे त्याचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे.
कल्याण : तिथीप्रमाणे साज-या करण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना शाखेच्या वतीने वादग्रस्त देखावा उभारण्यात आला आहे. या देखाव्याला पोलिसांनी हरकत घेतली आहे. हा देखावा काढून टाकण्याची नोटीस पोलिसांनी रामबागे शिवसेना शाखेला बजावली आहे.
अहमदनगर महापालिकेतील भाजपाचे माजी उपमहापौर छिंदम यानं शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्याचे कटआऊट शिवसेना शाखेच्या वतीने लावण्यात आले आहेत. छिंदम याला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लिपस्टिक, गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आहे, असे त्यांचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे. भारताविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना एका पाकिस्तानी मुजरा नर्तकीच्या रुपात दाखविण्यात आले होते. याशिवाय सीमेवर लढणा-या सैनिकांच्या कुटुंबीयांविषयी अश्लाघ्य उद्गार काढणारे भाजपा आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांच्याचेही धिंडवडे कटआऊटद्वारे काढण्यात आलेले आहेत. मणिशंकर अय्यर सोडले तर उर्वरित सगळी मंडळी भाजपाची आहे. ज्यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. याशिवाय शिवप्रतापाची कट आऊट दाखविण्यात आलेली आहेत. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोतळा बाहेर काढला हे कट आऊट लावण्यात आलेले आहे. रामबागेच्या शाखेने हा वादग्रस्त देखावा उभारल्याचे कळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामबाग शाखेला पोलिसांनी नोटीस बजावली असून देखाव्याविषयी हरकत घेतली आहे. वादग्रस्त देखावा तात्काळ काढून टाकण्यात यावा, असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या देखाव्यात व्यक्ती ही भाजपाच्या असून भाजपावर रामबाग शाखेने निशाणा साधल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे रामबाग शाखेचे म्हणणे आहे.