‘नीट’वरून श्रेयलढाई
By Admin | Published: May 21, 2016 05:35 AM2016-05-21T05:35:23+5:302016-05-21T05:35:23+5:30
यंदाच्या शैक्षणिक वर्षापुरती ‘नीट’ प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला
मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापुरती ‘नीट’ प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आणि राज्यात श्रेयाची एकच लढाई सुरू झाली. आम्हीच पुढाकार घेतला होता, असे म्हणत जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी या निर्णयावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी सर्वच नेत्यांनी नीट रद्द झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत श्रेयावर आपली दावेदारी सांगण्याचा प्रयत्न केला.
केंद्र शासनाने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वप्रथम विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. न्यायालयातून दिलासा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली आणि अध्यादेशाच्या मुद्द्यावर एकमत झाले. मात्र, त्याची सुरुवात आपणच केली होती असे सांगत मुंडे यांनी कोण, कधी, काय बोलले याची तारीखवार जंत्रीच देऊ केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तर थेट न्यूझीलंडमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारी व्हिडीओ क्लिप पाठविली. ‘नीट’मुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण होते. या विषयासाठी मला जेव्हा पालक भेटले तेव्हा मी स्वत: पंतप्रधानांशी संपर्क साधला. राज्यातील ४ लाख विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांना सांगितले. पंतप्रधानांनी माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन नीट परीक्षेचे बंधन रद्द केले. याबद्दल पंतप्रधानांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असे राज यांनी आपल्या संदेशात सांगितले. दरम्यान, महाराष्ट्राने नीटबाबत मांडलेल्या भूमिकेला केंद्र सरकारने पाठिंबा दिला. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, वेंकय्या नायडू, स्मृती इराणी यांचे आभार मानले. ३० एप्रिलपासून नीटबाबत राज्य सरकारने वेळोवेळी आपली भूमिका मांडून विविध राज्यांच्या मंत्र्यांसोबत, विद्यार्थी व पालकांसोबत बैठका घेऊन याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हा सकारात्मक निर्णय घेतल्याचे तावडे यांनी सांगितले.
>शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख टाळला
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाचे सारे श्रेय विद्यार्थ्यांना दिले. तणावाच्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी नीटच्या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे नीट लांबणीवर पडण्याचे सारे श्रेय विद्यार्थ्यांचे असल्याचा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
टिष्ट्वटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान,
मुख्यमंत्री अथवा शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख करणे आदित्य ठाकरे यांनी कटाक्षाने टाळले.