कोरेगाव तालुक्यातील तरुण गुजरातमध्ये ‘श्री ४२०’

By admin | Published: November 5, 2015 10:38 PM2015-11-05T22:38:12+5:302015-11-05T23:55:26+5:30

अहमदाबादेत गुन्हा : विवाहानंतर २५ लाख घेऊन छूमंतर झाल्याचा आरोप; आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी

'Shri 420' in 'Young Gujarat' in Koregaon Taluka | कोरेगाव तालुक्यातील तरुण गुजरातमध्ये ‘श्री ४२०’

कोरेगाव तालुक्यातील तरुण गुजरातमध्ये ‘श्री ४२०’

Next

सातारा : कोरेगाव तालुक्यातील विक्रम हनुमंत किंजले या तरुणाने गुजरातमधील वास्तव्यात आपल्याशी लग्न केले आणि त्यानंतर तब्बल २५ लाख रुपये घेऊन गायब झाला, अशी तक्रार अहमदाबादेतील एका तरुणीने तेथील पोलीस ठाण्यात केली आहे. आता हा तरुण आपल्याला धमकी देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. उच्चपदस्थाची लेक असूनही आता चक्क खानावळ चालविण्याची वेळ आपल्यावर आली असल्याचे ती म्हणते. तरुणीच्या म्हणण्यानुसार, हा तरुण कोरेगाव तालुक्यातील एका गावचा मूळ रहिवासी आहे. गुजरातेत नोकरीस जाताना त्याने आपल्याला हिऱ्याच्या उद्योगात नोकरी मिळाली असल्याचे गावात सांगितले होते. त्या काळात या तरुणीशी त्याची ओळख झाली. तिचे पूर्वी एका तरुणाशी संबंध होते आणि त्याच्यापासून तिला एक मुलगाही होता. ही बाब येथील तरुणाला ठाऊक होती. तरीही त्याने तिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
विवाहानंतर काही दिवस हा तरुण तिच्यासोबत राहिला. या काळात दोघांनीही तिचे सर्व बँक व्यवहार एकत्रितपणे हाताळले. तिचा एटीएम कोडही त्याला माहीत होता आणि तो तिचे बँक खाते हाताळत होता. या खात्यातून तब्बल १८ लाख रुपये त्याने काढून घेतले. तसेच तिच्या नातेवाइकाच्या खात्यावरही काही व्यवहार केले. एकंदर २५ लाख रुपये घेऊन तो गायब झाल्याची तरुणीची तक्रार आहे. दरम्यान, गुजरातेतून गायब झाल्यावर संबंधित तरुण कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी आला. त्याने माण तालुक्यातील एका तरुणीशी विवाह केला. तिला त्याच्या पहिल्या विवाहाबद्दल अंधारात ठेवले असल्याचे अहमदाबादची तरुणी सांगते. ती यासंदर्भात वकिलांना सोबत घेऊन तरुणाच्या गावी येऊन गेली. स्थानिक पोलीस ठाण्यात तिने हा प्रकार सांगितला, तेव्हा फिर्याद गुजरातमधील संबंधित ठाण्यातच नोंदवावी लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यानुसार तिने मरीनगर (अहमदाबाद) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या तरुणीकडे दोघांच्या विवाहाचे फोटो आहेत. मात्र, आता हा विवाह आणि तिच्या खात्यावरून काढलेली रक्कम दोन्ही विसरून जा, असे कोरेगाव तालुक्यातील तरुण आणि त्याचे कुटुंबीय आपल्याला सांगतात आणि धमकी देतात, असे ती सांगते. (प्रतिनिधी)


साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना अर्ज
यावर्षी जून महिन्यात गुजरातमध्ये हा विवाह झाला होता. दोनच महिन्यात कोरेगाव तालुक्यातील तरुण या तरुणीच्या बँकेतील रोकड काढून गायब झाला. यासंदर्भात सातारच्या पोलीस अधीक्षकांकडे १० सप्टेंबर २०१५ रोजी तक्रार दाखल केली असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. पैसे परत मागताच आपल्याला दटावले जाते, तसेच आपले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ नेटवर टाकण्याचीही धमकी दिली जाते, असे या तक्रारीत म्हटले आहे. या तरुणाच्या घरातील लोक त्याला सामील असून, तेही धमक्या देतात. सहा आॅगस्ट रोजी कोरेगाव तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्यात तिला साताऱ्यात घर घेऊन देण्याचा ‘समझोता’ झाला होता; पण तसे घडलेच नाही, असा उल्लेख या अर्जात आढळतो.

आत्महत्येचाही प्रयत्न

लग्न आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाने व्यथित झाल्याने आपण मच्छर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे तरुणीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: 'Shri 420' in 'Young Gujarat' in Koregaon Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.