तळावासीयांचे श्रद्धास्थान श्री चंडिका देवी
By Admin | Published: October 8, 2016 02:21 AM2016-10-08T02:21:55+5:302016-10-08T02:21:55+5:30
संपूर्ण तळावासीय नागरिकांचे श्रद्धास्थान तसेच ग्रामदैवत श्री चंडिका देवीचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत.
तळा : संपूर्ण तळावासीय नागरिकांचे श्रद्धास्थान तसेच ग्रामदैवत श्री चंडिका देवीचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. जवळपास २०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून या उत्सवाची परंपरा आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला श्री चंडिका देवीच्या मंदिरात घटस्थापना करून देवीची षोडोपचारे पूजा करून देवीचा घट बसविला जातोे. या पहिल्या दिवशी गावातील बारा वाड्यातील ग्रामस्थ भक्तिमय वातावरणात वाजतगाजत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत आपआपल्या वाडीवरील दिंडी घेवून येतात. या दहा दिवसांत रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, चिपळूण आदि ठिकाणावरून देखील भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
या देवस्थानचे अठरा वतनदार आहेत. ते सर्व वतनदार या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असतात. त्याचबरोबर आपआपली जबाबदारी व कामे व्यवस्थित पार पाडीत असतात. मुख्य वतनदाराच्या हस्ते श्री देवीची पूजा केली जाते. ज्याचे साल असते ते सालकरी सेवक देखील यथासांग श्री देवीची पूजा करतात. गुरव हे या देवीचे खरे पुजारी आहेत.
येथे नवरात्रौत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अठरा वतनदार आपली कामे करताना कुंभार घटाची माती घेवून येतात. बुरुड दोन परड्या, पंखा घेवून येतो, पानसरे गावातील वाण्याच्या दुकानातून अठरा प्रकारची धान्ये व अखंड दीपासाठी तेल घेवून येतो, यजमान पूजा साहित्य घेवून येतो, मंत्र जागरात घटाची स्थापना होते. पानसरे खायची पाने घटासाठी आणतो. घटाभोवती मातीत अठरा धान्ये पेरली जातात. घटामध्ये पाणी टाकून त्यावर परडी ठेवली जाते. शिंप्याने आणलेले कापड परडीवर ठेवल्यावर त्यावर नारळ ठेवला जातो. नंतर तिळाच्या फुलांची माळ चढविली जाते. मांग दररोज गोंधळाची कवने गातो. घटावर दररोज तिळाच्या फुलांची माळ चढविली जाते. नवरात्रांत देवीला दररोज वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे व दागिने चढविले जातात. तसेच फुलांनी सजविले जाते. मंदिरात दररोज भाविकांची विशेषत: महिलावर्गाची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. ही देवी जागृत देवस्थान आहे. श्री चंडिका देवी ही जागृत देवी असल्याचे मानले जाते. (वार्ताहर)