मूर्तिशाळांमध्ये श्रींवर अखेरचा हात
By Admin | Published: August 4, 2016 01:43 AM2016-08-04T01:43:55+5:302016-08-04T01:43:55+5:30
गणेशोत्सव येऊन ठेपला असताना शहर-उपनगरांतील मूर्तिशाळांमध्ये बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे
मुंबई : अवघ्या एका महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना शहर-उपनगरांतील मूर्तिशाळांमध्ये बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपजून आणि पाटपूजन सोहळे नुकतेच संपन्न झाल्याने आता गणेशभक्तांना आगमन सोहळ््यांचे वेध लागले आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून सध्या सर्वच मूर्तिशाळांमधील मूर्तिकार अखेरचा हात फिरवण्याच्या कामात व्यस्त आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आजही प्लॅस्टर आॅफ पॅरिसला पसंती देत असले तरी घरगुती उत्सवासाठी शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. शाडूच्या मातीचे भाव वधारल्याने या किमती वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
यंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तीच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर शाडूच्या मातीपासून बनवलेला किमतीमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एक फुटाच्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत जी गेल्या वर्षी १,५००च्या घरात होती, ती दोन हजारांपर्यंत गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने तसेच मजुरांच्या १० ते १५ टक्के कमतरतेमुळे ही भाववाढ झाली आहे, तर शाडूची माती जास्त कुठे मिळत नाही, ती गुजरातवरून मागवावी लागते, तसेच ती महाग असल्याने या मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
>विक्रेते वाढले, मूर्तिकार कमी
पेणवरून तयार मूर्ती आणून अनेकांनी गल्लोगल्ली स्वत:ची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे मुंबईतील मूर्तिकारांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. अनुभवी कामगार काम सोडून जात आहेत. दरवर्षी नवखे कामगार येत असल्यामुळे अर्धा वेळ त्यांना काम शिकवण्यातच जात आहे. कार्यशाळेसाठी स्वत:ची जागा नसल्यामुळे जागा भाड्याने घ्यावी लागते. महानगरपालीकेचे देखील सहकार्य लाभत नाही. त्यात दरवर्षी कामगारांची पगार वाढीची अपेक्षा असते. शाडूच्या मूर्ती बनवणारे कामगार कमी असल्यामुळे शाडूच्या मूर्ती कमी आहेत. शासनाने मूर्तिकारांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.
-आर. व्ही कामुलकर,
कामुलकर गणपती चित्रशाळा, चेंबूर
>मूर्तिकारांना ‘लो. टिळक पुरस्कार’ देण्यात यावा
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आज त्याला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या गणेशोत्सवात मूर्तिकारांचा मोलाचा वाटा असतो. पण आजच्या घडीला मूर्तिकार दुर्लक्षित होत आहेत. मूर्तिकारांच्या कलेची कदर व्हावी, यासाठी त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात यावा, ही सरकारकडे मागणी आहे. मोठ्या मूर्तींची मागणी दरवर्षी वाढत आहे. कार्यशाळेच्या जागेसाठी सरकारकडे मागणी करून थकलो, परंतु सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नाही.
- विजय खातू,
विजय खातू गणपती चित्रशाळा, परळ