Shridhar Patankar ED Raids: आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंचीही चौकशी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:09 PM2022-03-23T12:09:01+5:302022-03-23T12:10:30+5:30
नंदकिशोर चतुर्वेदी यांचे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याशी कोणते संबंध आहेत? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.
रणजीत इंगळे
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. या कारवाईत ईडीनं ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्ट, साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लि यांच्या ११ सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या हमसफर डीलर कंपनीकडून श्रीधरण पाटणकर यांच्या कंपनीला विनातारण ३० कोटींचे कर्ज देण्यात आले. यात अपारदर्शकता असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.
ईडीच्या कारवाईवर भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somiyya) यांनी दावा केला आहे की, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. २०१४ मध्ये आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स प्रॉपर्टी एलएलपी नावानं कंपनी स्थापन केली. त्यानंतर कोमो स्टॉक्स ही कंपनी हवाला ऑपरटेर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नावे हस्तांतरित झाली. मग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याशी कोणते संबंध आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच मागील अनेक महिने या प्रकरणाचा तपास सुरू होता. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबात १०-१२ वर्षापासून मनी लॉन्ड्रिंग सुरू आहे. २०१० आणि २०१४ मध्ये आदित्य ठाकरेंनी अशीच कंपनी नंदकिशोरला दिली होती. डर्टी डझन नेत्यांपैकी २ आतमध्ये गेलेत. पुढच्या काही दिवसांत कारवाईला गती येईल. ठाकरे कुटुंबाकडे आलेला पैसा भ्रष्टाचाराचा आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही काही दिवसांत गुन्हा दाखल होईल असा दावा सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मुर्ख समजलं आहे. तुम्ही लोकांना लुटून रक्त पिता कोणीतरी बोलायला लागल्यावर त्याला सूडबुद्धी बोलणार का? घोटाळेबाजांच्या विरोधात किरीट सोमय्या जिद्दीने लढत आहे. सगळे घाबरलेत कारण सर्वांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. घोटाळे बंद करा आणि जनतेचा पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करा नाहीतर ही लढाई अशीच सुरू राहील असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.