आई बापानं जमीन विकून शिकवलं; पोरानं यूपीएससी पास होत घरच्यांचं नाव काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:44 PM2019-02-08T12:44:36+5:302019-02-08T12:50:54+5:30
यूपीएससी परीक्षेत श्रीकांत खांडेकरचं नेत्रदीपक यश
सोलापूर: घरची बेताची परिस्थिती, शेतीतून मिळणारं तुटपुंजं उत्पन्न, त्यामुळे वडिलांना करावी लागणारी मजुरी अशा परिस्थितीचा सामना करत श्रीकांत खांडेकरनं केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत डोळे दिपवून टाकणारं यश मिळवलं. भारतीय वनसेवा परीक्षेत श्रीकांत 33 वा आला. श्रीकांतसह त्याच्या दोन भावांसाठी वडील कुंडलिक काबाडकष्ट केले. त्याचं श्रीकांतनं चीज केलं.
मंगळवेढा या दुष्काळी तालुत्यातल्या बावची गावात राहणारे कुंडलिक खांडेकर स्वत: अशिक्षित आहेत. मात्र त्यांना शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन एकर जमीन विकली. वडिलांच्या या कष्टाची श्रीकांतनं कायम जाण ठेवली. जिरायती जमीनतून फारसं उत्पन्न येत नसल्यानं कुंडलिक यांनी मजुरी केली. मात्र मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. श्रीकांतचं सुरुवातीचं शिक्षण बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून त्यानं बारावी पूर्ण केली. दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचं शिक्षण सुरू असतानाच श्रीकांतची आयआयटीत निवड झाली. मात्र तरीही तिकडे न वळता लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं यावर तो ठाम होता.
श्रीकांतनं एक वर्ष पुण्यात राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. त्यानंतर सहा महिने नवी दिल्लीत मुक्काम करुन जोरदार अभ्यास केला. परीक्षेच्या निकालात त्याची ही मेहनत अगदी स्पष्टपणे दिसून आली. पहिल्याच प्रयत्नात श्रीकांत देशात 33 वा आला, तर राज्यात ओबीसी प्रवर्गात दुसरा आला. मुलाच्या या यशानं कुटुंब सुखी झाल्याची बोलकी प्रतिक्रिया कुंडलिक यांनी दिली. आम्ही आजही रोजगारानं कामाला जातो. शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचं व्याज भरणं सुरू आहे. मुलांसाठी कष्ट घेतले. त्यांनी त्याची जाण ठेवून ते सार्थकी लावले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेताना सुरुवातीला इंग्रजीमुळे थोडा संघर्ष करावा लागल्याचं श्रीकांतनं सांगितलं. मात्र परिस्थितीची कायम जाणीव ठेवली. आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळवता आलं, असं श्रीकांतनं म्हटलं. शहरी मुलांशी स्वत:ची तुलना न करता ध्येय समोर ठेवून अविरत मेहनत केल्यास यश मिळतं, असा कानमंत्रही त्यानं दिला.