Shrikant Shinde Sanjay Raut: "संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:31 PM2023-02-23T15:31:00+5:302023-02-23T15:31:45+5:30
श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिली, असा आरोप राऊतांनी केला होता
Shrikant Shinde Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांनी याबाबतचं पत्रक ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होते. राऊतांनी लिहिलेल्या पत्रात थेट श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या मुद्द्यावर आज श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. "संजय राऊतांची मला खूप काळजी वाटते. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला आहे. संजय राऊत यांची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे सकाळचे मनोरंजन होणार नाही," अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर टोलेबाजी केली. अंबरनाथच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर नावाच्या गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर खळबळ उडाली. यावर गेल्या दोन दिवसात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज अंबरनाथमध्ये त्यांनी यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर टोलेबाजी केली.
"संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद आहेत. एकीकडे ते पोलिसांना चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देतात, दुसरीकडे आपल्या जबाबात तेच म्हणतात की, माझ्यावर शाईफेक केली जाईल किंवा धक्काबुक्की केली जाईल. त्यांचे सहकारी सहायक संपादक चिंदरकर सांगतात की, मी त्यांना फक्त काळजी घ्या, असे सांगितले होते. मी कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा काय करणार हे सांगितले नव्हते", असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. "संजय राऊत यांची मला काळजी वाटते. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला, असे लक्षण दिसत आहे. त्यात रुग्णाला भास होतात. मला कुणीतरी आवाज देतो, असे वाटते," असे सांगत श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना टोला लगावला. राऊत यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत राऊतांमुळे महाराष्ट्रातील जनेतेचे सकाळचे मनोरंजन होते, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.