Sangli: कवठेमहांकाळचे सुपुत्र श्रीकर परदेशी बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव, पंतप्रधान कार्यालयातही होते कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:25 PM2024-12-09T16:25:03+5:302024-12-09T16:27:09+5:30
कवठेमहांकाळ : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ...
कवठेमहांकाळ : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कवठेमहांकाळ शहरातील सुपुत्र श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
श्रीकर परदेशी यांनी प्रधानमंत्री कार्यालयात देखील काम केले आहे. परदेशी यांच्या कामाची पोहोचपावती असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते मुख्य सचिव म्हणून त्यांना पदभार दिला आहे. त्यामुळे परदेशी यांच्या कामाबाबत कवठेमहांकाळ वासीयांकडून कौतुक केले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. सूत्रे हातात घेताच महायुती सरकारने मोठा निर्णय घेत कवठेमहांकाळचे श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली.
यापूर्वी जुलै २०२२ रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
कोण आहेत श्रीकर परदेशी?
श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील २००१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले होते. दरम्यानच्या काळात श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पीएमओमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले होते. तो कालावधी संपल्यानंतर ते राज्यात जून २०२१ मध्ये परतले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ३० जून २०२२ ला स्थापन झाल्यानंतर काही दिवसांमध्येच श्रीकर परदेशी यांना सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून उपमुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
कवठेमहांकाळचे सुपुत्र
श्रीकर परदेशी हे कवठेमहांकाळ शहरातील आहेत. त्यांचे सर्व भावबांधकी येते राहतात. शिवाय त्यांचे शहरात घर आणि जमीन ही आहे. २००१ मध्ये ते महाराष्ट्रातून पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले होते. आज त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख झाली आहे.