श्रीक्षेत्र भीमाशंकरचा होणार कायापालट
By admin | Published: March 8, 2016 01:20 AM2016-03-08T01:20:10+5:302016-03-08T01:20:10+5:30
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे द्वादश ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकसित करण्यासाठी ‘भीमाशंकर परिसर विकास अराखडा’ बनविला जात आहे.
भीमाशंकर : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे द्वादश ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकसित करण्यासाठी ‘भीमाशंकर परिसर विकास अराखडा’ बनविला जात आहे. यासाठी १२५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या आराखड्यात भविष्याचा विचार करत अनेक पायाभूत सोईसुविधा, प्राथमिक सोयींचा समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा प्रत्यक्षात उतरल्यानंतर जंगलात वसलेले देशातील एक सुंदर विकसित देवस्थान अशी गणना या देवस्थानची होणार आहे.
नियोजित भीमाशंकर परिसर विकास आराखड्यासंदर्भात देवस्थानच्या सूचना व बदल विचारात घेण्यासाठी डिंभे येथे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव व कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. या वेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, जिल्हा नियोजन अधिकारी पी.आर. केंभावी, खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे, कल्याणराव पांढरे, सुभाषराव मोरमारे, विश्वस्त प्रशांत काळे, सुनील देशमुख इत्यादी उपस्थित होते.
भीमाशंकर मंदिर परिसरात अभयारण्य व खासगी जमिनींमुळे येथे जागेचा महत्त्वाचा प्रश्न असून, यामुळे येथे विकास करता येत नाही. भीमाशंकरमध्ये मुक्कामाची व जेवणाची चांगली सोय नाही, मंदिराकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे, दुकानांना कमी जागा असल्यामुळे पायऱ्यावरून चालताना भाविकांना जागा अपुरी पडते. मंदिर पाहण्यासाठी बनविण्यात आलेल्या गॅलरीचा उद्देशाप्रमाणे वापर होताना दिसत नाही. मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नाही. कचरा टाकण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेज नाहीत. सध्या अस्तित्वातील घरे अतिशय अरुंद जागेत वसलेली आहेत. दर्शनरांगेचे नियोजन नाही, पोलीस स्टेशन, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि वाहनतळ हे वन्यजीव विभागाच्या जागेत असून, त्यांना स्वत:ची जागा नसल्यामुळे अनेक समस्या यात्राकाळात भेडसावतात. पथदिवे, कचरापेट्या, बाकडे, माहितीफलक यांची व्यवस्था या ठिकाणी नाही.
देशातील भाविक येथे येतात. मात्र, या समस्यांमुळे येथे येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे भाविक जास्त वेळ येथे थांबत नाहीत. यासाठी भीमाशंकर परिसर विकास आराखडा तयार केला जावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. तसेच त्यांनी पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भीमाशंकर परिसर विकास आराखड्याला भरीव निधी दिला जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार हा आराखडा तयार केला जात आहे.
प्रशासनाने हा आराखडा करताना जागेसाठी खाजगी जमीन, ट्रस्ट मालकीची जमीन व वन्यजीव विभागाची जमीन किती आहे याची पाहणी करण्यात आली असून, या जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विकास आराखडा करताना भविष्याचा दृष्टिकोन ठेवून तरतुदी करण्यात आल्या आहेत. वन्यजीव विभागाच्या व्यास समितीने दिलेल्या सूचनांचे पालनही या आराखड्यात करण्यात आलेले आहे. या आराखड्यात बसस्थानकाजवळ पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र, फायरब्रिगेड, महाद्वार, मंदिराकडे जाण्यासाठी दोन पायऱ्यांचे मार्ग, वृद्ध, अपंगांसाठी थेट मंदिराकडे जाणारा रस्ता, या रस्त्यावर बॅटरी आॅपरेटेड कार, सध्या अस्तित्वातील दुकाने मागे घेऊन नवीन दुकाने बांधून देणार आहे. मंदिर परिसरात दगडांवर श्लोक कोरून इतिहासाच्या नोंद कोरल्या जाणार आहेत. जुन्या कुंडाचे सुशोभीकरण, नवीन दीपस्तंभ, नवीन नंदी, जुनी दर्शन गॅलरी पाडून येथे मुख्य प्रशासकीय इमारत, तसेच धार्मिक महत्त्व, मंदिराचे महत्त्व, वन विभागाची माहिती देण्यासाठी प्रेक्षागृह करण्यात येणार आहे. दोन ते तीन जागी खाण्याचे पदार्थ मिळतील अशा ठिकाणे, व्हीआयपी पार्किंग, हेलिपॅड, बॉम्बे पॉइंटकडे नक्षत्र गार्डन यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची माहिती, राशीचक्र व वेगवेगळी फळे-फुले असलेले बगिचे तयार करण्यात येणार आहेत.
> फॉरेस्ट, अभयारण्य, इको सेन्सेटिव्ह झोन यामुळे वन विभागाकडून जागा मिळवण्यासाठी तसेच खासगी जमिनी घेण्यासाठीसुद्धा वेळ लागणार आहे. यामध्ये दोन ते तीन वर्षे निघून गेल्यास भीमाशंकरमधील कामे थांबतील.
सध्या भक्तनिवासामधील अपुरी कामे, मंदिराकडे जाणारा रस्ता, छत, पाण्याची टाकी, भीमाशंकरकडे येणाऱ्या पर्यटकांनी होत असलेल्या डिंभे गार्डनच्या कामांसाठी ३२ कोटी रुपयांची आवश्यकता असून, ही कामे मंजूर व्हावीत अशी सूचना वळसे पाटील यांनी केली.
हा आराखडा पाहिल्यानंतर वळसे पाटील यांनी अनेक सूचना व बदल सुचवले. यामध्ये ऐतिहासिक महत्त्व बदलेल असे काही करू नका, भीमा नदीचा उगम जिथे आहे तेथेच ठेवा. हेलिपॅडची जागा इमारतींच्या जवळ आली असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी ही जागा लांब असावी. रस्ते करताना भविष्याचा विचार करून रस्त्यांची रुंदी ठेवली जावी. पाणी व ड्रेनेज याचा विचार केला जावा. पाणी हवे असल्यास कोंढवळ अथवा तेरूंगण तलावातून पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच कमलजामाता मंदिर, आंबेगाव तालुका दिंडी समाज, भीमाशंकर परिसर वारकरी मंडळ या तीन ट्रस्टच्या असलेल्या जागांवर भक्तनिवास व अन्नछत्र सुरू करण्यासाठी या तीन ट्रस्टशी पूर्वी चर्चा झाली आहे, प्रशासनाने त्यांच्याशी बोलून हे काम मार्गी लावावे.