स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार समजणा-या रत्नागिरीतील श्रीकृष्ण पाटील बुवाला पुन्हा अटक, जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 11:05 PM2017-09-21T23:05:57+5:302017-09-21T23:06:12+5:30
तालुक्यातील झरेवाडीतील श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवाच्या विरोधात गुरुवारी रात्री जादूटोणाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यासाठी सकाळी अटक झाल्यानंतर दुपारी त्याला जामीन मंजूर झाला.
रत्नागिरी, दि. 21 - तालुक्यातील झरेवाडीतील श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवाच्या विरोधात गुरुवारी रात्री जादूटोणाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यासाठी सकाळी अटक झाल्यानंतर दुपारी त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये पाटीलबुवाला पुन्हा अटक करण्यात आली. दरम्यान, झरेवाडीचा बुवाचा मठ बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रत्नागिरी शहरातील के. सी. जैननगर या गजबजलेल्या भागात बुधवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले. महिलेच्या फिर्यादीवरून त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. मात्र त्यानंतर पोलिसांनी या बुवाला पुन्हा ताब्यात घेतले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या निवेदनावरून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी त्याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम २ (१)ख, अनुसूची नं.२, ५, ८, कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
‘मी कलियुगातील स्वामींचा अवतार आहे. विष्णूचा अवतार आहे. स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे. मी चमत्कार करू शकतो, असे भासवून मेलेले मूल ३ सेकंदात जिवंत केले, आंधळ्याच्या डोळ्यावरून हात फिरविल्यानंतर त्याला दृष्टी आली. मी माणूस नाही देव आहे, असे सांगून लोकांना भीती दाखवली व त्यांच्याकडून आर्थिक प्राप्ती करून झरेवाडी येथे मठाचे बांधकाम केले.तसेच लोकांना डॉक्टरकडे जाऊ नका, असा सल्ला देऊन अनिष्ट व अघोरी प्रथांना खतपाणी घातले, असे आरोप श्रीकृष्ण अनंत पाटील (पाटील बुवा) याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या बाबाच्या कथित चमत्काराबाबत सुरस कथा चर्चेत होत्या. त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्नही झरेवाडीतील स्थानिकांनी केला होता. मात्र या बाबाला राजकीय अभय असल्यानेच कारवाई होत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती. अंधश्रध्देला खतपाणी घालणारा हा झरेवाडीतील बाबांचा मठ बंद करावा, अशी मागणीही केली जात होती. मात्र त्याची दखल त्यावेळी घेतली गेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून पाटीलबुवाच्या विविध लीलांच्या व्हिडिओ क्लीप्स सोशल मिडियावरून व्हायरल झाल्या. त्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत, असा आरोप केला जात होता. मात्र या बुवाविरोधात कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते ही पोलिसांची अडचण होती. तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या बुवाच्या विरोधात कारवाई केली आहे.
महिला पोलीस अधिका-याचा पाठिंबा
या बुवाला एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा पाठिंबा असल्याने ग्रामसभेत चर्चा होऊनही पुढे कोणतीही कारवाई झाली नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी आपल्या निवेदनातून जिल्हा प्रशासनासमोर मांडला आहे.