शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 11:08 AM2018-02-17T11:08:20+5:302018-02-17T11:15:17+5:30
श्रीपाद छिंदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अहमदनगर- शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला पोलिसांनी शुक्रावारी संध्याकाळी अटक केली होती. जिल्ह्यात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळी श्रीपाद छिंदमला न्यायालयात हजर केलं. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शनिवारी सकाळीच न्यायालयीन कामकाज आटोपून सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. शनिवारी न्यायालय आवारात होणारी गर्दी लक्षात घेऊन सकाळी 8 वाजताच न्यायालयीन कामकाज आटोपण्यात आले.
छिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने सरकारी वकिलांच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली होती. छिंदम याला 1मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी सकाळी छिंदमने मनपा बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी काल माणसे का पाठविली नाहीत, याची विचारणा केली होती. शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो, असे बिडवे म्हणाले होते. त्यानंतर शिवाजी महाराज व शिवजय़ंतीबाबत छिंदम यांनी अपशब्द वापरले.
बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली. त्याचवेळी छिंदम यांचे कार्यालय व घरासमारे शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करत गाड्या फोडल्या. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपमहापौर छिंदम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. महापालिकेतील उपमहापौर छिंदम यांचे कार्यालय फोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन छेडलं आहे.