मोठी स्वप्ने बघितल्याशिवाय माणूस मोठा होत नाही! सृष्टी देशमुख यांनी सांगितले यशाचे गमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:09 AM2019-05-05T04:09:25+5:302019-05-05T04:09:44+5:30
यूपीएससीच्या परीक्षेत देशातून मुलींमधून पहिली येऊ, असे वाटले नव्हते. केवळ अभ्यासातील सातत्य, परिश्रम आणि ध्येय यामुळे यश मिळाले. मोठे स्वप्न पाहिले, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचलीे. - सृष्टी जयंत देशमुख
- नितीन गव्हाळे
अकोला : स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना, ध्येय निश्चित केल्याचा फायदा होतो. यूपीएससीची तयारी करताना, डायनामिक पॅटर्न आहे. करंट अफेअर्सवर लक्ष केंद्रित करावे लागते. यूपीएससी परीक्षेत देशात मुलींमधून पहिली आलेल्या मूळच्या नांदुऱ्याच्या आणि सध्या भोपाळ येथे स्थायिक झालेल्या सृष्टी जयंत देशमुख शुक्रवारी प्रा. प्रशांत देशमुख यांच्या घरी आल्या असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना, यूपीएससी परीक्षेकडे कशा वळल्या?
उत्तर : बीई केमिकलच्या द्वितीय वर्षाला शिकत असताना, स्पर्धा परीक्षेकडे वळले. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून आयएएस व्हायचंच, हे ध्येय ठेवलं आणि अभ्यासाला लागले. यूपीएससीच्या तयारीसाठी अनेक जण दिल्लीला जातात; परंतु मी तेथे न जाता, भोपाळमध्येच आठ महिन्यांचा फाउंडेशनचा कोर्स केला आणि यश प्राप्त केले.
प्रश्न : यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली, यश प्राप्त करण्यासाठी कसे परिश्रम घेतले?
उत्तर : माझं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण भोपाळला झालं. बीई केमिकलच्या द्वितीय वर्षाला असतानाच, यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. कॉलेज करून दररोज ५-६ तास यूपीएससीचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, स्वयंअध्ययनावर भर दिला आणि किती टॉपिक्स कव्हर होऊ शकतात, हे बघितले. अभ्यास करताना, यूपीएससी परीक्षेत देशातून पाचवा क्रमांक आणि मुलींमधून प्रथम येऊ, याचा विचारही केला नव्हता.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेबाबत काय संदेश द्याल?
उत्तर : मोठी स्वप्ने बघा, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचा. जे लोक मोठी स्वप्ने बघतात, मोठं ध्येय ठेवतात. तीच लोकं आयुष्यात मोठी होतात आणि यश त्यांच्या पदरी पडतं.
प्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुटुंबीयांचे कसे पाठबळ मिळाले?
उत्तर : प्रत्येक गोष्टीसाठी कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे असते. त्यांच्याकडून प्रोत्साहन, तू हे करू शकते, अशी कौतुकाची थाप हवी असते. मी मूळची नांदुºयाची. आजोबा नोकरीनिमित्ताने भोपाळला स्थायिक झाले. वडील जयंत देशमुख हे भोपाळ येथे अभियंता तर आई सुनीता ही शिक्षिका आहे. आता देशात कुठेही आयएएस अधिकारी म्हणून काम करताना, सर्वप्रथम मुलींचे शिक्षण, एज्युकेशन इन जर्नल, पर्यावरण विषयांवर काम करायचे आहे. समाजासाठी काम करायचे आहे.
आधी ध्येय ठरवा
कोणतीही स्पर्धा परीक्षा ही कठीण नसते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, आधी ध्येय ठरवा. जे आवडतं तेच करा. उगाच कुठल्याही गोष्टीमध्ये अडकू नका. आवडणाºया गोष्टीसाठी भरपूर वेळ द्या आणि बघा तुमची स्वप्ने साकार होतात की नाही.