...झाले एकदाचे शुभमंगल सावधान !

By admin | Published: April 29, 2016 02:56 AM2016-04-29T02:56:25+5:302016-04-29T02:56:25+5:30

लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले

Shubhamangal alert once! | ...झाले एकदाचे शुभमंगल सावधान !

...झाले एकदाचे शुभमंगल सावधान !

Next

रवी रामगुंडेवार,
एटापल्ली (गडचिरोली)- लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले. एटापल्ली परिसरातील गोंड आदिवासी जमातीमध्ये आजही हीआगळीवेगळी परंपरा जोपासली जाते. जीवनगट्टा येथील सुमारे १२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
गोंड जमातीमध्ये आर्थिक परिस्थिती लग्नाच्या आड येत नाही. परिस्थिती हलाखीची असल्यास गोंड जमातीतील परंपरेनुसार कोणताही समारंभ न करता वर वधूला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य रितसर सुरू होते. जेव्हा केव्हा आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळी लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली जाते. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गोंड जमातीचे नागरिक मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासत आहेत. मात्र आयुष्याच्या शेवटी का होईना लग्नसमारंभ आयोजित केला जातो.
जीवनगट्टा येथे गोंड जमातीची एकूण ९६ घरे आहेत. लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. या गावातील १२ जोडप्यांचे विवाह २८ एप्रिल रोजी त्यांच्या घरी पार पडले. भोजनाचा कार्यक्रम मात्र सामूहिक ठेवण्यात आला होता. बोहल्यावर चढलेल्या जोडप्यांनी वैवाहिक आयुष्य सुरू करून दोन ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, या सर्वांचा सामूहिक विवाह सोहळा पुढील आठवड्यात गावाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी नियोजनही केले आहे. यापूर्वीही १९९४-९५ मध्ये २० जोडप्यांचा विवाह याच गावात लावून देण्यात आला होता.
मुलीचे लग्न कसे करायचे, या चिंतेतून किंवा लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावर झाल्याने आत्महत्या होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर गोंड जमातीमधील ही परंपरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
>छोट्याशा गावाने केले मोठे काम...
>आर्थिक परिस्थितीमुळे लग्न करून शकणाऱ्या जोडप्यांना एकत्रित राहण्यास समाजाची मान्यता आहे. परंतु अधिकृत लग्न बोहला चढल्याशिवाय अशा जोडप्यांना धार्मिक कार्यात पूजाविधी बंद असते. त्यामुळे त्यांना विवाह करावाच लागतो. त्याचाच हा सोहळा आहे. एका छोट्याशा गावात समाजाच्या पुढाकाराने हे मोठे कार्य पार पडले आहे.
- देवानंद गावडे, गोंड समाजातील प्रमुख व्यक्ती

Web Title: Shubhamangal alert once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.