मंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल! ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:54 AM2018-04-21T00:54:07+5:302018-04-21T00:54:07+5:30
मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे लाखो सामाजिक संस्था, धार्मिक ट्रस्ट नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यातील बºयाचशा संस्थांकडे पैसा असूनही त्या समाजासाठी काहीच खर्च करीत नाहीत. त्यांच्याकडून हा पैसा घेऊन त्यातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.
यासाठी जिल्हास्तरावर ‘सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा समिती’ स्थापन करुन धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली आहे. या समित्यांच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून त्यात जमा होणाºया निधीतून विवाह सोहळ्यांचा खर्च केला जाणार आहे. या समितीमध्ये सहभागी झालेल्या देवस्थान ट्रस्टकडील पैसाही यात वापरला जाणार आहे.
यवतमाळ जिल्हास्तरीय विवाह मेळावा १२ मे रोजी होणार आहे. तर राज्यभरातील जिल्ह्यांमध्येही मे मध्येच सर्वधर्मीय सामूहिक मेळावे होणार असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी दिली.
सामाजिक कामांसाठी खर्च होत नसल्याने अनेक संस्थांची मान्यता काढून घेण्यात आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१ हजार नोंदणीकृत संस्था असल्या तरी त्यातील ४ हजार संस्थांची मान्यता गेल्या वर्षभरात रद्द करावी लागली.
- जयदीप चौहान, सहायक धर्मादाय आयुक्त, यवतमाळ