शुभांगी जोगदंड हत्या प्रकरण: आठवीत असतानाच लावून देणार होते शुभांगीचे लग्न, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 08:11 AM2023-01-29T08:11:35+5:302023-01-29T08:11:53+5:30
Shubhangi jogdand Murder case: मन सुन्न करणाऱ्या भावी डॉक्टर मुलीच्या हत्याकांडाने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. क्रूर पित्याने आणि भावांनी निर्दयपणे खून केला त्या शुभांगीचे इयत्ता आठवीत असतानाच लग्न करण्याची तयारी होती
नांदेड : मन सुन्न करणाऱ्या भावी डॉक्टर मुलीच्या हत्याकांडाने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. क्रूर पित्याने आणि भावांनी निर्दयपणे खून केला त्या शुभांगीचे इयत्ता आठवीत असतानाच लग्न करण्याची तयारी होती; परंतु शाळेतील शिक्षकांनी तुमची लेक हुशार आहे, उद्या नाव करेल, असे समजावून सांगितल्यानंतर तिला शिकण्याची संधी दिली. ती शिकलीही; परंतु शुभांगीने एक पाऊल प्रेमाच्या वाटेवर टाकले अन् होत्याचे नव्हते झाले.
जनार्दन जोगदंड यांना दोन मुली आणि एक मुलगा, अशी तीन अपत्ये. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. मोठी मुलगी गावातील पोलिस पाटलांच्याच घरी दिली. शुभांगीच्या लग्नाचाही विचार त्यांनी केला; परंतु ती अभ्यासात हुशार असल्याने गुरुजींचा आग्रह मान्य करून ऐपत नसताना तिला नांदेडात शिक्षणासाठी ठेवले.
वडिलांच्या इच्छेमुळे लग्नाला होकार
n वडिलांच्या इच्छेमुळे तिने लग्नाला होकार दिला आणि कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला. मात्र, त्यानंतर तिच्या प्रियकराने वराकडील मंडळींना तिचे असलेले संबंध सांगून काही फोटो दाखविले.
त्यामुळे नियोजित वराकडील मंडळींनी सोयरीक मोडली. त्यातूनच पुढे मनात भरलेला राग आणि खोट्या प्रतिष्ठेतून बाप अन् भावाने मिळून तिचा गळा आवळला.
सापडलेल्या हाडांची होणार डीएनए चाचणी
पोलिसांनी घटनास्थळ आणि हिवरा परिसरातून मांडी, डोके यांसह इतर हाडांचे काही अवशेष गोळा केले आहेत. हे अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याचा डीएनए काढल्यानंतर ती हाडे शुभांगीची आहेत का? हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
घरच्यांना कळले अन् सोयरीक केली
- शुभांगीने शिकवणीशिवाय स्वत:च्या गुणवत्तेवर नीटमध्ये भरघोस गुण घेतले. तिचा तीन वर्षांपूर्वीच नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसला नंबर लागला. जोगदंड कुटुंबीय खुश होते.
- शुभांगी गावातील एका मुलाच्या प्रेमात पडल्याची कुणकूण घरी लागली. त्यानंतर त्यांनी तिला समज देत, यातून बाहेर पडण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिची साेयरीक केली.