मुंबईवरून गदारोळ
By Admin | Published: December 22, 2014 11:59 PM2014-12-22T23:59:32+5:302014-12-22T23:59:32+5:30
मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले
नागपूर : मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सूतोवाच व या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र यावरून सोमवारी विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्यावर एकत्र येत सभागृहात नारेबाजी केली. या विषयावर विरोधी पक्षाने दिलेला स्थगन स्वीकारण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन नाकारल्यामुळे नारेबाजी करीत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग राहील, असे स्पष्ट केले.
सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी परवानगी दिली नाही. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आव्हाड यांनी पुन्हा एकदा स्थगन प्रस्तावादरम्यान हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु या वेळीही अध्यक्षांनी स्थगन नाकारला. आव्हाड यांनी चर्चेची मागणी लावून धरली. परंतु अध्यक्षांनी पुढील कामकाज सुरू केले. यामुळे नाराज झालेले आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी करू लागले. विरोधी ‘मुंबई आमच्या हक्काची...’ मुंबई तोडू देणार नाही...’ असे नारे देऊ लागले. शेवटी अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले.
कामकाज पुन्हा सुरू होताच आव्हाड यांनी मुंबईवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. अध्यक्षांनी मागणी फेटाळून लावताच विरोधी पक्षाचे सदस्य पुन्हा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी करू लागले. परंतु अध्यक्षांनी कामकाज सुरूच ठेवले व विरोधी पक्षाच्या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. समिती स्थापन झाली तरी मुंबईवर केंद्राचा अधिकार राहणार नाही. मुंबई महाराष्ट्राचीच राहील, असेही अध्यक्ष बागडे म्हणाले. मात्र विरोधक चर्चेच्या मागणीवर अडून राहिले. दरम्यान काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून समितीचा विरोध केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सभागृहात याची चर्चा झाली पाहिजे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे सत्तापक्षाचे सदस्य भडकले. अनेक सदस्य उभे राहून नारेबाजी करू लागले. दोन्ही बाजूंनी गदारोळ सुरू होता, तरी अध्यक्षांनी कामकाज मात्र थांबविले नाही. शेवटी विरोधकांनी सभात्याग करून विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)