शेटफळ हवेलीचा तलाव कोरडा ठणठणीत
By admin | Published: April 27, 2016 01:21 AM2016-04-27T01:21:32+5:302016-04-27T01:21:32+5:30
शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे असलेल्या तळ्यामधील पाण्याने या वर्षी पहिल्यांदाच तळ गाठला आहे.
वडापुरी : शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे असलेल्या तळ्यामधील पाण्याने या वर्षी पहिल्यांदाच तळ गाठला आहे. या परिसरातील शेटफळ हवेली, बावडा, भोडणी, वकीलवस्ती, लाखेवाडी, पिठेवाडी, नीरनिमगाव, भगतवाडी, सराटी या भागांना शेतीच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळ्याने तळ गाठला असल्याने या परिसरातील शेतकरी यांना शेतीसाठी पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
आलेल्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याची परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे. शेतीसाठी पाणी मिळेल, या आशेवर या भागातील शेतकऱ्यांनी ऊस, मका, डाळिंब इत्यादी पिके लावली. परंतु, सध्या तलावातच पाणी नाही, तर शेतीला पाणी कोठून आणायचे, अशी वेळ आल्याने पिकेसुद्धा जळून चालली आहेत. तर, डाळींच्या बागा पाण्यावाचून जळून चालल्या आहेत. त्या सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांना आली असल्याची परिस्थिती या भागात पाहावयास मिळत आहे.
शेटफळ हवेली येथील बांधलेले तळे हे जवळजवळ ६२० एमसीएफटी एवढे पाणी साठवण क्षमतेचे मोठे तळे आहे. गेली शंभर ते दीडशे वर्षामध्ये हे तळे कधीच आटले नाही. परंतु, गेल्या पाच -सहा वर्षांपासून पाऊसच पडला नसल्याने तळ्यामधील असलेली पाण्याची पातळी कमी होत गेली. भाटघर धरणामध्येच पाणी कमी असल्याने खाली पाणी आले नाही. आज या घडीला तलावामध्ये शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे.