११५ वर्षांत शेटफळ हवेली तलाव कोरडा

By admin | Published: March 12, 2016 01:27 AM2016-03-12T01:27:08+5:302016-03-12T01:27:08+5:30

निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे.

Shuttle mansion lakes dry in 115 years | ११५ वर्षांत शेटफळ हवेली तलाव कोरडा

११५ वर्षांत शेटफळ हवेली तलाव कोरडा

Next

इंदापूर : निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे. ज्या बहाद्दर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला शेटफळ हवेली तलावासह वीर व भाटघर धरणाची निर्मिती करावी लागली, त्या ज्ञानदेव भोंगळे यांच्या गावातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
पाऊण टीएमसी क्षमतेच्या शेटफळ हवेली तलावाची निर्मिती सन १८६९ साली ब्रिटिश सरकारने केली. त्या वेळेपासून शेटफळ, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, भोडणी, लाखेवाडी, पिठेवाडी, भगतवाडी, नीरा निमगाव, सराटी, चाकाटी या ११ गावांतील १ हजार ९२० हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आलेले आहे.
हा तलाव नीरा डाव्या कालव्याचाच एक भाग आहे. पाटबंधारे खात्याने नीरा डाव्या कालव्यास सहा आवर्तने नेमून दिली आहेत. वीर, भाटघर धरण या वर्षी कमी प्रमाणात भरल्याने शेटफळ हवेलीच्या तलावात गेल्या ११ महिन्यांपासून पाण्याचे आवर्तन आले नाही. त्यामुळे तलाव कोरडा पडला आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना शेटफळ हवेलीचे माजी सरपंच, जलअभ्यासक बाळासाहेब करगळ यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मंजुरी मिळालेल्या वीर धरणाचे काम सन १९५४ साली पूर्ण झाले.
पाण्याचे वाटप करताना भाटघर २३ टक्के, नीरा डावा कालवा ४३ टक्के, नीरा उजवा कालवा ५७ टक्के असा आराखडा निश्चित करण्यात आला.
सन १९५४-५५ मध्ये फलटण येथे पाणी परिषद घेऊन यशवंतराव
चव्हाण यांनी वीर धरणातील पाणीवाटप निश्चित केले. त्या वेळी इंदापूरचे तत्कालीन लोकप्रतिनिधी दिवंगत शंकरराव पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात होते. मात्र, नीरा डाव्या कालव्याला पाणी मिळाले नाही.
सन १९८५ साली नीरा देवघर धरण सुरू झाले. वीर धरणाच्या वरच्या बाजूस बांधण्यात आलेल्या या बारा टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या धरणातून आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधीला इंदापूर तालुक्यासाठी पाणी आणता आले नाही. सन १९९६ ला युती शासनाने गुंजवणी धरणाची निर्मिती केली. तालुक्याचे तत्कालीन लोकप्रतिनिधी हर्षवर्धन पाटील त्या वेळी राज्यमंत्री होते. त्यांनाही ते पाणी तालुक्यात आणता आले नाही. (वार्ताहर)
>वीर, भाटघर न भरल्याने तलावात पाणी नाही...
धरणाच्या प्रकल्प अहवालात पावसाळी हंगामात नीरा कालव्यास पाणी देण्याची तरतूद केली जाते. केंद्र सरकारच्या लवादाने ४८ टीएमसी पाणी नीरा व्हॅलीमध्ये अडविण्यास परवानगी दिली आहे. वीर धरणात नऊ टीएमसी, गुंजवणीत चार टीएमसी, पंचवीस तलावात चार टीएमसी पाणीसाठा करण्यासाठी परवानगी राज्य शासनाने केंद्रीय जलआयोगाकडे १२/९/९६ रोजी मागितली होती. पाणीसाठा होण्याची विश्वासार्हता नसल्याने ४/८/२००३ रोजी परवानगी नाकारली. तत्पूर्वी युती सरकारने नीरा देवघर व गुंजवणी ही दोन्ही धरणे बांधली आहेत. नीरा नदी ४२ टीएमसीपेक्षा वाहत नाही, हे माहीत असूनही धरणे बांधली गेली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीचे सिंचन संपणार आहे. शेटफळ तलाव हा नीरा डावा कालव्याचा एक भाग आहे. पाटबंधारे विभागाने नीरा डाव्या कालव्यास सहा आवर्तन दिली आहेत. परंतु वीर,भाटघर धरण कमी प्रमाणात भरल्याने पाणी सोडण्यात आले नाही. अकरा महिन्यांत एकही आवर्तन तलावात आले नाही म्हणून तलाव आटला.

Web Title: Shuttle mansion lakes dry in 115 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.