शटल सेवा सुरू होण्याचे संकेत
By Admin | Published: June 27, 2016 02:07 AM2016-06-27T02:07:53+5:302016-06-27T02:07:53+5:30
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती
माथेरान : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यावेळी माथेरान-अमन लॉज ही मिनी ट्रेनची शटल सेवा बंद देखील करण्यात आली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून मिनी ट्रेन पुन्हा नॅरोगेज ट्रॅकवर येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नेरळ लोकोचा कुर्ला येथे गेलेला कर्मचारी वर्ग पुन्हा नेरळ लोकोमध्ये रविवारपासून कार्यरत झाला असून, लवकरच मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
मिनी ट्रेनचे प्रवासी डबे दोन वेळा घसरल्याने त्यामुळे ९ मे पासून मिनी ट्रेनची सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवली होती. नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सेवेबरोबर अमन लॉज -माथेरान ही शटल सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याने माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला होता. त्यानंतर राजकीय पक्षांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने रेल्वेमंत्र्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिनी ट्रेन बंद होणार नाही, असे जाहीर केले होते. त्यात महत्त्वाचे म्हणजे मिनी ट्रेनचा सर्व भार वाहणारा नेरळ लोको येथील ५२ कर्मचारीवर्ग यांना मे महिन्यात कुर्ला येथे हलविण्यत आला होता. त्यामुळे मिनी ट्रेनचे भवितव्य अंधारात होते.
१५ जूननंतर दरवर्षी नेरळ - माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद केली जाते. त्या आधी मिनी ट्रेन सुरू न झाल्याने माथेरान-अमन लॉज या शटल सेवेबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरवर्षी पावसाळ्यात मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू असल्याने पर्यटक पावसाळ्यात माथेरानला येत असतात. मात्र काही दिवसांपूर्वी ट्रॅकची देखभाल करणाऱ्या पीडब्लूआय विभागाने मिनी ट्रेनचा नॅरोगेज ट्रॅक गाडी पावसाळ्यात सुरू ठेवण्यासाठी योग्य असल्याचे रेल्वेच्या पीडब्लूआयने मध्य रेल्वे प्रशासनास कळविले आहे. त्यानुसार २५ जून रोजी मध्य रेल्वेच्या कल्याण येथील काही अभियंत्यांनी नेरळ -माथेरान मिनी ट्रेनच्या ट्रॅकची पाहणी के ली. (वार्ताहर)
पर्यटकांचा प्रतिसाद
येत्या काही दिवसांत मिनी ट्रेनची माथेरान-अमन लॉज ही शटल सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शटल सेवा गेल्या वर्षी पावसाळ्यात सुरू होती.अमन लॉज-माथेरान हे अंतर २.६ कि.मी. असून या सेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे. मात्र ही मिनी ट्रेनची शटल सेवा चालविणारा पायलट स्टाफ अद्याप नेरळ येथे परत आलेला नाही.
>महत्त्वाचे मुद्दे
९ मे पासून मिनी ट्रेन बंद
एकाच वेळी शटल सेवा आणि नेरळ-माथेरान सेवा बंद
नेरळ लोकोमधील १० मे रोजी कुर्ला येथे पाठविलेले ५२ कर्मचारी परत बोलावले
नॅरोगेज मार्गावरील झाडे कापण्याचे काम सुरू
पायलट स्टाफ परत आला नाही