श्वेता-अभिषेक बच्चनला समान संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 05:46 AM2017-03-03T05:46:40+5:302017-03-03T05:46:40+5:30
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपत्तीत मुलगी श्वेता आणि पुत्र अभिषेक यांना समान हक्क प्रदान करून स्त्री-पुरूष समानतेचा संदेश दिला
मुंबई: आठवडाभरावर असलेल्या जागतिक महिला दिनाचे (८ मार्च) निमित्त साधून बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपत्तीत मुलगी श्वेता आणि पुत्र अभिषेक यांना समान हक्क प्रदान करून स्त्री-पुरूष समानतेचा संदेश दिला आहे. बच्चन यांनी ट्विटरवर एक इमेज पोस्ट केली असून त्यात आपण सर्वजण समान आहोत, असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर स्त्री-पुरूष समानतेच्या शिकवणीचा स्वत: अवलंब करत मृत्यूनंतर माझ्या सर्व संपत्तींचे मुलगी (श्वेता नंदा) आणि मुलगा (अभिषेक बच्चन) यांच्यात समसमान वाटप होईल असे त्यांनी या मेसेजमध्ये म्हटले आहे. बच्चन यांची ही पोस्ट हजारो जणांनी लाईक केली आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर गुरु वारी पहाटे २ वाजून ७ मिनिटांनी एक पोस्ट केली आहे.
भारतात वडिलोपार्जित संपत्तीबाबत कायदा असला तरी आजही मुलींना लग्नानंतर माहेरच्या संपत्तीवर कोणताही हक्क सांगता येत नाही. विडलोपार्जित संपत्ती ही मुलाकडे सोपवली जाते. त्यामुळे अमिताभ यांनी उचललेले हे पाऊल आणि त्याद्वारे दिलेला समानतेचा संदेश महत्वाचा मानला जात आहे.