सिद्धिविनायक मंदिर वगळले

By admin | Published: February 13, 2016 02:03 AM2016-02-13T02:03:57+5:302016-02-13T02:03:57+5:30

पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहूनच २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून सिद्धिविनायक आणि नौदलाचा हवाई तळ ‘टार्गेट’च्या यादीतून वगळण्याची सूचना आपणच लष्कर-ए-तोयबा

Siddhivinayak Temple is excluded | सिद्धिविनायक मंदिर वगळले

सिद्धिविनायक मंदिर वगळले

Next

मुंबई : पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहूनच २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून सिद्धिविनायक आणि नौदलाचा हवाई तळ ‘टार्गेट’च्या यादीतून वगळण्याची सूचना आपणच लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि आयएसआयला केल्याचे अमेरिकन नागरिक व माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याने शुक्रवारी सांगितले.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अमेरिकेतून डेव्हिड हेडलीची मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयात साक्ष नोंदवण्यात येत आहे. तो म्हणाला, मी सिद्धिविनायक मंदिराचे आतून व बाहेरून फोटो आणि व्हिडीओ शूट केले होते. त्याचबरोबर नौदलाच्या हवाई तळाची पाहणी केली. मात्र दोन्ही ठिकाणी कडक बंदोबस्त असल्याने सर्व १० दहशतवाद्यांना एकाच ठिकाणी लढावे लागले असते, म्हणून मी ही दोन्ही ठिकाणी ‘टार्गेट’च्या यादीतून वगळण्याची सूचना साजिद मीर आणि आयएसआयचा मेजर इक्बाल यांना केली आणि या दोघांनीही ही सूचना मान्य केली.
सिद्धिविनायक मंदिराची रेकी करताना हेडलीने तेथूनच मुंबईवर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या अतिरेक्यांसाठी लाल-पिवळे धागे विकत घेतले. ‘हिंदू धर्माचे पालन करणारे त्यांच्या मनगटाला लाल-पिवळ्या रंगाचा धागा लावतात, हे मला त्या मंदिराची रेकी करताना कळले. मी १०-१५ धागे विकत घेतले आणि पाकिस्तानला गेल्यावर साजिद मीरला दिले.
मुंबईवर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या १० अतिरेक्यांवर कोणाला संशय येऊ नये, यासाठी हे त्यांच्या मनगटावर बांधण्यास मी मीरला सांगितले. त्यानुसार मुंबईत येताना या अतिरेक्यांच्या मनगटावर हे धागे बांधण्यात आल्याची माहिती साजिदनेच मला दिली, अशीही साक्ष हेडलीने दिली.
मुंबईवरील हल्ला यशस्वी झालाच पाहिजे, असे साजिदला
वाटत होते. त्याच्या मते आत्तापर्यंत भारताने जेवढे बॉम्बस्फोट घडवले, त्याला हे पाकिस्तानचे चोख
उत्तर असेल, असे साजिदने
म्हटल्याचे हेडलीने सांगितले. शनिवारीही हेडलीची साक्ष नोंदवण्याचे काम सुरूच राहणार
आहे. (प्रतिनिधी)

एलईटी आणि आयएसआयने मुंबईसाठी दोन आॅपरेशन ठेवली होती. ‘इग्रेस’ आणि ‘स्ट्राँग होल्ड’ आॅपरेशन. आधी ‘इग्रेस’ची निवड करण्यात आली. मात्र ते नंतर रद्द करून ‘स्ट्राँग होल्ड’ची निवड करण्यात आली. ‘इग्रेस’ म्हणजे एका ठिकाणी हल्ला करून दुसऱ्या ठिकाणी हल्ला करायला जाणे. मात्र ‘एलईटी’ने हे आॅपरेशन रद्द केले. कारण एका ठिकाणी हल्ला करत असताना अतिरेक्यांच्या डोक्यात आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे, असे सतत येत राहील म्हणून ‘स्टाँग होल्ड’ आॅपरेशन करण्याचा निर्णय झाला. यात एकाच ठिकाणी हल्ला करायचा असतो. जीवंत असेपर्यंत एकाच ठिकाणी पोलीस यंत्रणांशी लढण्याचे ठरले, असे हेडलीने न्या. जी. ए. सानप यांना सांगितले.

कराचीच्या कंट्रोल रूमहून सूचना
कराची येथील कंट्रोल रूममधून अतिरक्यांना सूचना दिल्या जायच्या. भारतातून आणलेले मोबाइल आणि सिम क्रमांकावर पाकिस्तानातून फोन केला जाऊ शकतो का? हे तपासण्यासाठी साजिदने मला वाघा बॉर्डरवर पाठवले होते.
त्याने १० जणांसाठी आणलेल्या मोबाइल आणि सिमकार्डपैकी एक मोबाइल आणि नंबर देऊन वाघा बॉर्डरवर पाठवले. तेथे नेटवर्क मिळाले आणि साजिदने केलेला कॉलही लागला, असे हेडली म्हणाला.

आयएसआय नाराज
‘लष्कर’च्या हल्ल्यांच्या ठिकाणांच्या यादीत मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याने आयएसआयचा मेजर इक्बाल नाराज झाला होता. त्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण होते.

राहुल भटला ओळखतो
मोक्ष जिममधील हेडलीचा मित्र
आणि चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा राहुल भट याचा हेडली मित्र होता. हेडलीने राहुलची एका शरीरसौष्ठव स्पर्धेत ओळख
झाल्याचे सांगितले.

‘हिंदू धर्माचे पालन करणारे त्यांच्या मनगटाला लाल-पिवळ्या रंगाचा धागा लावतात, हे मला त्या मंदिराची रेकी करताना कळले. मी १०-१५ धागे विकत घेतले आणि पाकिस्तानला गेल्यावर साजिद मीरला दिले.

Web Title: Siddhivinayak Temple is excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.