साध्वीचा जामीन फेटाळला

By Admin | Published: June 29, 2016 06:11 AM2016-06-29T06:11:33+5:302016-06-29T06:14:29+5:30

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिचा जामीन अर्ज फेटाळून विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) न्यायालयाने मंगळवारी एनआयला जोरदार झटका दिला.

Siddiqui's bail is denied | साध्वीचा जामीन फेटाळला

साध्वीचा जामीन फेटाळला

googlenewsNext


मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिचा जामीन अर्ज फेटाळून विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) न्यायालयाने मंगळवारी एनआयला जोरदार झटका दिला. साध्वीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने तिला क्लीनचिट देण्याच्या एनआयच्या निर्णयावर विशेष एनआयए न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रथमदर्शनी साध्वीचा या बॉम्बस्फोटाशी संबंध आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
साध्वीविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने व काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने एनआयएने १३ मे रोजी सादर केलेल्या आरोपपत्रातून साध्वी व अन्य दोघांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले. तसेच या सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने तब्येतीचे कारण पुढे करत व एनआयने दिलेल्या क्लीन चीटच्या आधारावर विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला नाही. मात्र मालेगाव २००८ बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत साध्वीच्या जामिनावर आक्षेप घेतला. तर साध्वीच्या जामीन अर्जाला पाठिंबा देणारा मध्यस्थी अर्जही न्यायालयात दाखल करण्यात आला. ‘साध्वीविरुद्ध एनआयएकडे एकही पुरावा नाही. ज्या मोटारसायकलवर बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट करण्यात आला, ती मोटारसायकल साध्वीने बॉम्बस्फोटाच्या दोन वर्षांपूर्वीच रामचंद्र कलासंग्राला विकली होती. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने साध्वीविरुद्ध काहीही पुरावे नाहीत. त्यामुळे तिची जामिनावर सुटका करावी,’ अशी विनंती साध्वीच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला केली.
सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने साध्वीची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.
‘मोक्का हटवण्यात आला असला तरी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवर अवलंबून राहता येऊ शकते,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले. साध्वीच्या मोटारसायकलबद्दलच्या संबंधाबद्दल स्पष्ट करताना न्यायालयाने म्हटले की, मोटारसायकलची नोंदणी साध्वीच्या नावावर करण्यात आली होती. या मोटारसायकलची मालक म्हणून ती प्रथमदर्शनी (साध्वी) या बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याने नाकारू शकत नाही. ‘साक्षीदारांच्या साक्षीमधील कोणता भाग योग्य आहे, हे आत्ताच न तपासता असे म्हटले जाऊ शकते की, भोपाळमध्ये आयोजित केलेल बैठकीत (मालेगाव बॉम्बस्फोटासंबंधी ठेवण्यात आलेली बैठक) प्रज्ञा उपस्थित होती. या बैठकीत जिहादींच्या औरंगाबाद आणि मालेगावमध्ये वाढलेल्या चळवळींविषयी चर्चा करण्यात आली होती. या बैठकीमधील उपस्थितांना ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करायचे होते,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी शब- ए - बारातच्या दिवशी मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला तर १०१ लोक गंभीररीत्या जखमी झाली. या बॉम्वस्फोटासाठी साध्वीची मोटारसायकल वापरण्यात आल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
>न्यायालयाचे निरीक्षण
‘एनआयएने तपास पुढे नेण्याऐवजी याप्रकरणाचा पुन्हा एकदा तपास केला. केवळ एनआयएने क्लीन चीट दिली म्हणून साध्वीला अर्ज मंजूर करावा, हे मान्य करणे कठीण आहे.
यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आरोपीवर ठेवण्यात आलेले आरोप खरे आहेत,’
असे विशेष न्यायाधीश एस. डी. टेकाळे यांनी म्हटले.

Web Title: Siddiqui's bail is denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.