पालिकेला कामगारांचा वेढा
By admin | Published: May 19, 2016 02:34 AM2016-05-19T02:34:01+5:302016-05-19T02:34:01+5:30
मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वाहतूक कामगारांनी महापालिकेला बुधवारी सळो की पळो करून सोडले.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वाहतूक कामगारांनी महापालिकेला बुधवारी सळो की पळो करून सोडले. किमान वेतनाच्या मागणीसाठी कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या मार्गदर्शनाने शेकडो कामगारांनी आयुक्तांना अर्ज देण्यासाठी पालिकेला वेढा घातला होता.
आझाद मैदान पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी गर्दी केलेल्या कामगारांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही कोणतेही आंदोलन करत नसल्याचे सांगत, कामगारांनी आयुक्तांना किमान वेतनाची मागणी करणारे पत्रक पाठवत असल्याचे सांगितले. संघटनेने शिस्तबद्धपणे पालिकेच्या डिस्पॅच डिपार्टमेंटबाहेर रांग लावली. मात्र, शेकडो कामगार एकाच वेळी अर्ज दाखल करण्यास जमा झाल्याने पालिका कार्यालयाला कामगारांचा वेढा बसला.
याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे सचिव विजय दळवी म्हणाले की, ‘गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने कंत्राटी कामगारांना १३ हजार ७४० रुपये किमान वेतन जाहीर केले. त्याची अधिसूचनाही काढली. मात्र, एका वर्षानंतरही कंत्राटी काममगारांना किमान वेतनासाठी झगडावे लागत आहे. याबाबत आयुक्तांकडे संघटनेने चर्चेसाठी वेळ मागितला होता. मात्र, महापालिका प्रशासनातील कोणताही अधिकारी चर्चा करण्यास तयार नाही. परिणामी, प्रत्येक कामगाराने आयुक्तांना अर्ज करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्याप्रमाणे, पाचशेहून अधिक अर्ज बुधवारी जमा करण्यात आले.
आता संघटना आयुक्तांच्या उत्तराची वाट पाहत आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)