शहान्नवव्या वर्षी नेत्रदानातून दृष्टी
By admin | Published: May 6, 2017 02:22 AM2017-05-06T02:22:54+5:302017-05-06T02:22:54+5:30
आयुष्याची ९६ वर्षे सरली; पण एवढ्या वृद्धापकाळात कोणाला दृष्टिदान मिळाल्याचे आजोबांनी ऐकले होते ना पाहिले. म्हणूनच हे आजोबा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : आयुष्याची ९६ वर्षे सरली; पण एवढ्या वृद्धापकाळात कोणाला दृष्टिदान मिळाल्याचे आजोबांनी ऐकले होते ना पाहिले. म्हणूनच हे आजोबा ठरलेत अत्यंत भाग्यवान. महिन्याभरापूर्वी झालेल्या पंतूचा चेहरा न्याहळताना त्यांचे हात थरथरले आणि डोळ्यात दाटून आले आनंदाश्रू. डोळे दान करणारा दाता अन् त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण करणारे डॉक्टर यांच्या प्रति त्यांच्या मनात आहेत कृतज्ञतेचे भाव.
पुण्यातील रंगनाथ नामदेव भागवत (वय ९६) यांची उभी हयात कष्टात गेली. बहुतांशी आरोग्य निरोगी लाभले. हीच या आजोबांची सर्वांत मोठी पुंजी. पण, आयुष्याला कोणाचीतरी दृष्ट लागली. १९८९ मध्ये त्यांचे मोतिबिंदूचे आॅपरेशन झाले. मात्र, आॅगस्ट २०१६ ला त्यांच्या डोळ्यात पांढरा डाग दिसू लागला. हळूहळू त्यांची दृष्टी कमजोर होऊ लागली. पाहता पाहता त्यांचे दिसणे बंद झाले.
याच परिस्थितीत त्यांना पणतू झाल्याची बातमी कानावर पडली; परंतु त्याला पाहण्यासाठी त्यांच्याकडे पूर्वीसारखी दृष्टी नव्हती. यासाठी त्यांचा मुलगा रवींद्र व राजेंद्र यांनी रुग्णालयात तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी त्यांचे बुब्बुळ खराब झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला. मात्र, नेत्रदानातून आलेल्या बुब्बुळाचे प्रत्यारोपण करून दृष्टी मिळू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु, वयाच्या ९६ व्या वर्षी नेत्ररोपण करण्याबाबत त्यांच्या कुटुंबात चर्चा सुरू झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची नावनोंदणी नेत्रपेढीत करण्यात आली.
२८ एप्रिल रोजी नेत्रपेढीत नेत्रदान झाले. २९ तारखेला डॉक्टरांनी भागवत परिवाराला फोन करून नेत्र प्रत्यारोपण करण्यासाठी बोलाविले. त्याच दिवशी येथील डॉ. सीमा जगदाळे-मांढरे व शिल्पा जोशी यांनी त्यांचे नेत्ररोपण शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेत आजोबांच्या प्रकृतीनेही चांगली साथ दिली. अतिशय किचकट असणारी ही शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांपुढे आव्हान होते; परंतु त्यांच्या प्रकृतीचा विचार करत डॉक्टरांनी ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्याचा आनंद डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही दिसत होता.
मृत्यूपच्छात होणाऱ्या नेत्रदानामुळे कोणाच्यातरी आयुष्यात चांगले दिवस येतात याचीच प्रचिती या नेत्रदानातून मिळाली
आहे. ज्या परिवाराने आपल्या व्यक्तीच्या
मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करून घेतले, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळेच मी आज पुन्हा हे सुंदर जग पाहू शकलो, अशा भावना त्या आजोबांनी व्यक्त केल्या.
गैरसमजामुळे चळवळीला येताहेत अडचणी
नेत्रदानासाठी वयाची मर्यादा लागत नाही. तसेच नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यासाठीही वय पाहायची गरज नाही, असाच अनुभव या घटनेतून आला आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची मानसिकता समाजात रुजणे महत्त्वाचे आहे. नेत्रदान जनजागृतीसाठी अनेक संस्था व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. मात्र, अजूनही समाजात याबाबत गैरसमज असल्याने अडचणी येत आहेत. बुबुळाला दुसरा कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश टाकण्यासाठी नेत्रदान होणे महत्त्वाचे आहे. यासाठी समाजातील व्यक्तींनी नेत्रदान करून घेण्याचा संकल्प धरून नेत्रदान करून घेतले पाहिजे. म्हणजेच ‘नेत्रदाता’ झाले पाहिजे. - डॉ. मदन देशपांडे