गर्दीनुसार होणार सिग्नलचा वेळ कमी-अधिक
By admin | Published: April 8, 2017 01:22 AM2017-04-08T01:22:08+5:302017-04-08T01:22:08+5:30
गर्दीनुसार सिग्नलचा वेळ कमी-अधिक होण्यासाठी खास संगणकीकृत ‘अॅडॉपडेट ट्रॅकिंग सिस्टिम’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी गर्दीनुसार सिग्नलचा वेळ कमी-अधिक होण्यासाठी खास संगणकीकृत ‘अॅडॉपडेट ट्रॅकिंग सिस्टिम’ यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरातील तब्बल ३५० प्रमुख चौकांमध्ये सुमारे २५० कोटी रुपये खर्च करून ही सिस्टिम बसविण्यात येणार आहे.
शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरामध्ये विविध नव-नवीन योजना राबविण्यात येत आहे. शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने वाहनांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात सकाळ-संध्याकाळ काही चौकांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होते. सध्या टायमर यंत्रणेद्वारे सिग्नलच्या वेळेचे सेटिंग केली जाते.
यामुळे शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठीच्या वेळा सेट करून ठेवल्या जातात. परंतु साचेबद्ध पद्धतीमुळे अनेक वेळा मोठी वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील वाहतूककोंडी नियंत्रित करण्यासाठी ‘अॅडॉपडेट ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या असून, एका कंपनीची निवड करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
>५० रस्त्यांवर डिजिटल फलक लावणार
शहरातील एखाद्या रस्त्यावर अपघात झाला, मिरवणूक, मोर्चा अथवा अन्य कोणत्याही कामानिमित्त रस्ता बंद ठेवण्यात आला असेल तर याची माहिती नागरिकांना देण्यासाठी शहरातील प्रमुख ५० रस्त्यांवर डिजिटल फलकदेखील लावण्यात येणार आहे. संगणक प्रणालीच्या माध्यमातूून अॅटोमॅटिक रस्ता बंद असल्याची व पर्यायी मार्गाची माहिती डिजिटल फलकाद्वारे मिळणार आहे.तसेच अत्यावश्यक सेवेतील अॅम्ब्युलन्सला यापुढे जीपीएस सिस्टिम बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ही जीपीएस सिस्टिम संगणक प्रणालीशी जोडण्यात येणार असून, अॅम्ब्युलन्स विनासिग्नल कमी वेळेत रुग्णालयामध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे.