EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:35 PM2024-12-02T19:35:51+5:302024-12-02T19:37:49+5:30

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

signature campaign from tomorrow of Vanchit Bahujan Aghadi against EVM, Prakash Ambedkar's big announcement | EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 2004 पासून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच, ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. याशिवाय, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. 

आता ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर काँग्रेससहीत महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करून वाढलेल्या मतांच्या टक्क्याकडे बोट दाखवत हा जनतेने दिलेला निकाल नाही, असे मत महाविकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आले आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने ही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे.

Web Title: signature campaign from tomorrow of Vanchit Bahujan Aghadi against EVM, Prakash Ambedkar's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.