बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

By admin | Published: December 6, 2015 03:40 AM2015-12-06T03:40:25+5:302015-12-06T03:40:25+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर

The signature of Dr. Babasaheb will be seen in London! | बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

Next

- प्रदीप यादव,  सातारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतेवेळी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी १ हजार ११४व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याचे कारण, या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, ते निवासस्थान अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतले आहे. या निवासस्थानात संग्रहालय होणार असून, त्यामध्ये डॉ. आंबेडकरांची पहिली स्वाक्षरी झळकणार
आहे. त्यामुळे या स्वाक्षरीला आता जागतिक स्वरूपाचे महत्त्व येऊ लागले आहे. यासाठी गेली १३ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळ्याचे आयोजन करणारे सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते अरुण जावळे प्रयत्न करीत आहेत.
या स्वाक्षरीने बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया साताऱ्यात भक्कम करून पुढे ते यशस्वीपणे शिकत राहिले. विदेशातल्या विद्यापीठांमध्ये आपल्या ज्ञानाचा अमीट ठसा उमटविला. जगद्विख्यात झाले. म्हणूनच ‘नॉलेज
आॅफ सिम्बॉल’ ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या स्वाक्षरीला एक आगळंवेगळंं महत्त्व आहे.
भारत सरकारने डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक स्मृती जतन करण्याचे धोरण अवलंबले आहे. सातारच्या मातीमध्ये डॉ. आंबेडकरांसारखा युगपुरुष शिकला, बागडला. याच मातीमध्ये त्यांनी वास्तव्य केले. या घटना सातारकरांचे ऊर भरून आणणाऱ्या अशाच आहेत. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि या स्वाक्षरीलाही आपण सलामच करायला हवा, असे मत अरुण जावळे यांनी व्यक्त केले.

हा तर साताराभूमीचा गौरव
आता या स्वाक्षरीला जागतिक अशा स्वरूपाचे महत्त्व प्राप्त होणार असून, जगभरातील आंबेडकर अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळाप्रवेशाच्या दरम्यानची स्वाक्षरी लंडन येथे पाहावयास मिळणार आहे.
एका अर्थाने हा सातारच्या भूमीचा, भीमाईभूमीचा गौरव आहेच; परंतु प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे कार्यकर्तृत्व उभे करणाऱ्या महामानवाचाही अभिमान वाटणार आहे. ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, या देशाला संहिता दिली, नव्हेतर त्या संहितेमुळे जगाच्या पाठीवर सर्वोत्तम अशी लोकशाही प्रणाली निर्माण केली, अशा संविधान शिल्पकाराच्या स्वाक्षरीला म्हणूनच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हा ऐतिहासिक स्वाक्षरी आजही शाळा व्यवस्थापनाने दस्तावेज म्हणून जतन करून ठेवली आहे. आता ही स्वाक्षरी लंडनस्थित त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या संग्रहालयात समाविष्ट व्हावी यासाठी राज्य शासनासह आंबेडकरी चळवळीतील देश-विदेशातील नेते, अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार आणि चर्चा केली आहे.
- अरुण जावळे,
सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते, सातारा

Web Title: The signature of Dr. Babasaheb will be seen in London!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.