राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट, दिवसभरात ५ हजार ९८४ बाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 09:15 AM2020-10-20T09:15:45+5:302020-10-20T09:16:00+5:30
मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांत सातत्याने कोरोनाच्या रुग्ण निदानाचा आलेख २०-२२ हजारांच्या वर असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर ...
मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांत सातत्याने कोरोनाच्या रुग्ण निदानाचा आलेख २०-२२ हजारांच्या वर असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नव्या रुग्णांचे दैनंदिन निदान १० हजारांवर आले. मात्र मोठ्या कालावधीनंतर राज्यात सोमवारी पहिल्यांदाच कमी म्हणजे ५ हजार ९८४ कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाले, तर १२५ मृत्यूंची नोंद झाली.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ लाख १ हजार ३६५ झाली असून बळींचा आकडा ४२ हजार २४० आहे. सध्या १ लाख ७३ हजार ७५९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी दिवसभरात १५,०६९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोविडमुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.६४ टक्के आहे.
सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
मुंबईत १९,९०६ सक्रिय रुग्ण -
मुंबई : मुंबईत सध्या १९ हजार ९०६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्क्यांवर आले असून आतापर्यंत २ लाख १२ हजार ९७९ रुग्ण कोविडमुक्त झाले.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी ९५ दिवसांवर आला आहे. सोमवारी १ हजार २३४ रुग्णांचे निदान झाले असून ४३ मृत्यूंची नोंद झाली. एकूण बाधित २ लाख ४३ हजार १६९ असून मृतांची संख्या ९ हजार ८१९ वर पोहोचली आहे.